पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असते, तेथे धक्काबुक्की करून प्रकाशापर्यंत पोचणारे रोप लगते. त्यासाठी जास्त उंचीचा उपयोग होतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपल्याकडे तुफान माजलेले गाजर गवत किंवा कॉंग्रेस गवत. ज्या भागात त्याचे नुकतच आगमन झाले आहे, तुरळक उगवण आहे, तिथे बहुतेक रोपे फूटदीड फुटापर्यंत दिसतात. फार उंच वाढ- णारे रोप असते त्याची बरीच शक्ती उंची वाढवण्यात जाते आणि बिया कमी तयार होतात. म्हणून त्याचे प्रमाण पुढच्या पिढीत वाढत नाही. उलट गाजर गवताचे आक्रमण होऊन बरीच वर्षे झाली की उपलब्ध सगळ्या जागा त्याने व्यापलेल्याच असतात. आता मर्यादित जागेत स्पर्धा सुरू होते. ही रोपे पावसाळ्यात वाढतात, त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य नसते. कमी पडतो तो उजेड. मग जी रोपे उंच वाढण्याची जीन्स घेऊन जन्माला येतात, त्यांनाच प्रकाश भरपूर मिळतो. बुटकी रोपे खच्ची होतात. त्यामुळे अशा ठिकाणी तीन किंवा चार फुटापर्यंत उंचीचे गाजर गवत दिसते. एखाद्या कापड दुकानात 'सेल' लावल्यावर पेठेतल्या बाकीच्यांनाही 'सेल' लावावा लागतो त्यापैकीच प्रकार.
 कीटकभक्षक झाडांबद्दल तुम्ही ऐकले असेल. त्यांच्या आकर्षक पाना-फुलांवर तो किडा येऊन बसला की चिकटतो, अडकतो किंवा ते फूल चक्क त्या किड्याला कोंडून टाकते. कोळ्याच्या जाळ्याची परिणामकारकता आपण सर्वांनी बघितलेली असते. पण कोळ्याच्या शिकारीचा आणखी एक बारकावा कसा असतो पाहा. जाळ्यात सापडलेला किडा छोटा असेल, सहज हाताळण्याजोगा असेल, तर कोळी सरळ त्याला धाग्यात गुंडाळून टाकतो आणि त्याच्या अंगातला रस शोषून घेतो. पण अडकलेला कीटक फार मोठा असेल, तर कोळी आधी त्याला बेशुद्ध पाडणारे इंजेक्शन देतो आणि मग पुढची व्यवस्था करतो.
 गळ टाकून बसणे ही माणसाची मक्तेदारी नव्हे. काही मासेसुद्धा अन्न मिळवण्या- साठी हे करतात. त्यांच्या नाकाला एक लांबडे ' शेपूट' असते. स्वस्थ बसून मासा ते शेपूट हलवत राहतो. तो पाण्यातला किडा आहे असे वाटून त्याला खायला कोणी सरसावला की या माशाच्या घशात जातो.

 शिकार करणारे एक हुशार तर ज्यांची शिकार होते ते त्याहून 'हुशार' ! (म्हणजे हा नुसता बोलण्याचा भाग बरे का ! हुशार कोणीच नाही. गुणबदलाने घडवलेली

४२ / नराचा नारायण