पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ते दातांवर ग्राइंडरसारखे घासले जाऊन दात झिजतात. ही झीज साधारण खाल्लेल्या गवताच्या प्रमाणात असते. त्यामुळे अशा प्राण्याचा नुसता जबडा बघितला तरी त्यातल्या दातांची झीज पाहून त्याला कोणत्या वयात मरण आले याचा अंदाज येतो. या दात झिजण्याचा त्रास मोठ्या प्राण्यांना कमी होतो. प्राणी दुप्पट उंचीचा असेल, तर त्याची अन्नाची गरज क्षेत्रफळाच्या प्रमाणात म्हणजे चौपट होते. उलट दातांची वाढ घनफळात म्हणजे आठपट होते. त्यामुळे दात जास्त काळ पुरतात. छोट्या प्राण्यांना ते पुरत नाहीत. म्हणून त्यांचे दात आयुष्यभर वाढत असतात.
 मोठ्या आकाराचे फायदे मिळत उत्क्रांत झालेल्या प्राण्याचे उत्तम उदाहरण म्हणजे घोडा. दगडातील अवशेषांच्या ( फॉसिल्स) अभ्यासातून घोड्याच्या उत्क्रांतीचा सात कोटी वर्षांचा इतिहास माणसाला माहीत झाला आहे. सुरुवातीला हा प्राणी फूटभर उंचीचा होता. त्याच्या पुढच्या पायांना चार तर मागच्या पायांना तीन बोटे होती. याच्या दाढा छोटया होत्या. हा पाणथळ भागात राहून अगदी मऊ चारा खात असावा. आणखी दोन-अडीच कोटी वर्षात त्याची उंची दुप्पट झाली. चारही पायांना तीन तीन बोटे, त्यातले मधले बोट इतरांपेक्षा बरेच मोठे होते. आणखी तीन कोटी वर्षात घोडा चार फूट उंचीचा झाला. त्याच्या दाढा आजच्या घोडयासारख्या होत्या. तो कुरणांमधे चरत होता. आता बोटांच्या जागी टापा तयार झाल्या होत्या. घोडा कठीण जमिनीवरून दौडू लागला होता. आज दिसतो तो घोडा सुमारे दहा लाख वर्षांपूर्वी उत्तर अमेरिकेत प्रथम निर्माण झाला असावा. तेथून त्याचा ऑस्ट्रेलिया वगळता सर्व जगभर प्रसार झाला. पण मग उत्तर अमेरिकेतून तो नष्ट झाला. साहेबाने त्याला युरोपातून पुन्हा अमेरिकेत नेला. गाढव, झेब्रा वगैरे प्राणीसुद्धा मूळच्या भादि- अश्वापासून निर्माण झाले असावेत.

 वनस्पती पाणी, क्षार आणि इतर अन्नद्रव्ये मिळवतात ती मुळांच्या माध्यमातून. ज्या मातीत पाणी झिरपून खूप खाली जाते, तिच्यात निसर्गतः वाढणाऱ्या वनस्पतींची मुळेसुद्धा खूप खोल जातात. जेथे पाण्याचा फार तुटवडा असतो, तिथल्या वनस्पती आपल्या शरीरात पाणी साठवून ठेवतात. पाण्याच्या कमतरतेला तोंड देण्याकरता आपल्या उच्छ्वासावाटे पाणी शक्यतो बाहेर जाणार नाही अशी पानांची रचना घडते. वनस्पतींना अन्न बनवण्यासाठी सूर्यप्रकाश लागतो. जेथे वनस्पतींची खूप गर्दी

अनुरूपता / ४१