पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रस्तावना


माणसाजवळ त्याच्या बुद्धीच्या जोरावर आव्हाने पेलण्याची जी शक्ती आहे ती इतर कोणत्याही जीवजातीत नाही. वाढत्या लोकसंख्येला जे तोंड देता येत आहे त्याचे रहस्य या शक्तीत आहे. नवीन जातीच्या गाई, नवनवीन हायब्रीड पिकांच्या जाती आणि तत्सम शोध ही या यशाच्या रहस्याची उदाहरणे आहेत. अनुवांशिकताशास्त्र अन् कृत्रिम सिलेक्शन हा या विज्ञानाचा पाया आहे. पण या शक्तीबरोबरच हिरोशिमावर टाकलेल्या ॲटम्बाँबने हे पण दाखवून दिले की माणसाजवळ त्याच्या संस्कृतीचा संहार करण्याची शक्ती पण तितकीच मोठी आहे. जेथे माकडाचा माणूस होण्यास हजारो वर्षे लागली तेथे स्वतःच्या स्वार्थासाठी विज्ञानाचा गैरवापर करून मानव आपल्या संस्कृतीचा शेवट एका घटकेतसुद्धा करू शकतो, हा विचार मनाला विषण्ण करणारा आहे. "मानवजात ही शक्ती आणि हे हात उगारण्यासाठी वापरणार की उभारण्यासाठी ? आपल्या जीवनाचे साफल्य, आपला सत्चित् आनंद कशामध्ये आहे हे मानवालाच ठरवावयाचे आहे. उत्क्रांतीच्या आजवरच्या प्रवाहामध्ये ही जबाबदारी पेलण्याचे सामर्थ्य माणसामध्ये येईल का ? " 'नराचा नारायण " या पुस्तकात उत्क्रांतीच्या चष्म्यातून पाहून अनिल गोरे यांनी या प्रश्नास योग्य वेळी आणि प्रभावी लिखाणाने वाचा फोडली आहे.

अनिल गोरे यांचा यक्षप्रश्न किती महत्त्वाचा आहे हे जगाकडे दृष्टी टाकली की कळून येते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने माणसाला एवढी प्रचंड शक्ती दिलेली असतानाही निम्म्याहून अधिक लोकांना आज माणूस म्हणून जगता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. आपण सामाजिक सुधारणेच्या मोठमोठ्या गप्पा मारतो. विज्ञानविषयक शिबिरे खेडेगावात भरवतो,

खेडेगावात जाऊन राहा म्हणून मुलांना प्रवृत्त करतो, पण खेड्यातील परिस्थितीत फारसा फरक झालेला आढळत नाही. खेड्यात फार काळ राहण्याची वेळ आली की आपण कचरतो. तेथले अपुरे पाणी, माशा, डास, अस्वच्छता, शिक्षणाची गैरसोय आणि एकंदर राहणीमान बघितले की शहरात परत यावेसे वाटते. खेडेगावातील लोकांना शहरात शिक्षणास आणले तरी तीच गत. शिकूनसवरून झाल्यावर ती मुले आपापल्या घरी जाण्यास तयार होत नाहीत. त्यांना शहरातच नोकऱ्या पाहिजे असतात. शहरात गलिच्छ वस्त्या

सहा