पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शास्त्रज्ञाने दाखवून दिले की, घुंगुरट्यांवर क्ष किरणांचा मारा केला तर पुढच्या पिढीत बरेच गुणबदल झालेले दिसतात. याचाच अर्थ क्ष किरणांमुळे शुक्रजंतू आणि अंडी निर्माण होण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. ज्या कारणांमुळे गुणबदल होतो, त्याला म्युटाजेन (बदलजनक ) असे म्हणतात.

 एक प्रश्न असा पडतो की, शास्त्रज्ञ या घुंगुरट्यांचा आणि चिलटांचा का अभ्यास करतात ? कारण तो सोपा आहे. असे म्हणतात की, मुत्सद्देगिरी म्हणजे काय शक्य आहे ते ओळखून त्याचा पाठपुरावा करणे. असेही म्हणतात की, संशोधनातली मुख्य हुशारी म्हणजे सुटतील असे वेचक प्रश्न हाती घेणे. अनुवांशिकतेच्या अभ्यासात प्राण्याचे वेगवेगळे गुणधर्म पिढ्यान् पिढ्या पाहात राहावे लागते. पण त्याकरता आपण जिवंत असायला हवे. कासवाचे आयुष्य शंभर वर्षांहून जास्त आहे. त्याच्या किती पिढ्यांचा अभ्यास आपण करू शकणार ? घुंगुरट्यांची नवी पिढी दर दीड-दोन आठवड्यात तयार होते. दुसरी गोष्ट म्हणजे अनुवांशिकतेचे नियम हे सरासरी स्वरूपाचे असतात. एका प्राण्यात काय दिसेल हे नेमकेपणाने सांगता येत नाही. प्रयोगात समाविष्ट जीवांची संख्या बरीच असावी लागते. त्यां दृष्टीनेसुद्धा मोठे प्राणी गैरसोयीचे आहेत. घुंगुरट्यांमधे रंगसूत्रांच्या फक्त चार जोड्या म्हणजे एकूण आठ रंगसूत्रे असतात. शिवाय त्यांच्या लाळ निर्माण करणाऱ्या ग्रंथींमधील पेशींची रंगसूत्रे फार मोठ्या आकाराची असतात. ( त्यांच्या अनेक प्रती निर्माण होतात. पण त्या एकमेकांना चिकटून राहतात. ) अशी रंगसूत्रे सूक्ष्मदर्शकाखाली सहज तपासता येतात. समजा एका चिलटाचे डोळे लाल आहेत तर दुसऱ्याचे पांढरे. त्यांच्या रंग- सूत्रांची बारकाईने तुलना केली. नेमक्या एका विशिष्ट रंगसूत्रावर एका ठिकाणी गडदपणात फरक दिसला, तर असा तर्क करता येईल की, डोळ्याचा रंग त्या रंग- सूत्राच्या त्या विशिष्ट भागावरून ठरतो. अशा एका भागाला म्हणतात जीन. त्या वरूनच जेनेटिक्स हे नाव आले. एका रंगसूत्रांवर शेकड्यांनी जीन्स असतात. काही गुणधर्म एका जीनमुळे ठरतात. मेडेलने असेच गुणधर्म. तपासले. काही गुणधर्म अनेक जीन्सच्या एकत्र परिणामस्वरूपात दिसतात. माणसाची उंची, गायीचे दुधाचे प्रमाण ही या प्रकारची उदाहरणे आहेत. यांच्या बाबतीत गणित मांडणे खूपच अवघड जाते.

घेवडे, घुंगुरटी आणि घोटाळे / ३३