पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कुरकुरता चालेल का ? मेलेली ढोरे ओढणारा माणूस, सवयीने, त्या घाणीला नाक मुरडायचे विसरतो. पण त्याला सुगंधी अत्तराचे फवारे मारलेल्या खोलीत बसवले तर बाईट वाटेल का ? प्रश्न सवयीने काय होऊ शकते हा नसून, जन्मजात गुणधर्म कसे बदलतात हा आहे. कुलंगी कुत्र्याला भरपूर खाऊपिऊ घातले, तर त्याचा अल्से- शिअन होईल का ? सिंह मरायला टेकला तरी गवत खाईल का ? नाही. हे जन्मजात गुणधर्म. पेपर्ड मॉथ या फुलपाखराच्या उदाहरणात आपण पाहिले की, काही फुलपाखरे पांढरा तर काही काळा रंग घेऊन जन्मतात. हा फरक का ?

 ही कोडी सुटायला एक नवी शास्त्रशाखा जन्मावी लागली. तिचे नाव जेनेटिक्स किंवा अनुवांशिकताशास्त्र. ग्रेगोर योहान मेंडेल हा ऑस्ट्रियन पाद्री तिचा जनक. मेंडेलच्या आधी लोकांना अनुवांशिकता माहीत होती. त्यात काय ? आईबाप तशी पोरे. खाण तशी माती. आडात ते पोहोऱ्यात. ' अमक्याच्या घराण्यात फेफऱ्याचा रोग आहे. नको ग बाई मुलगी द्यायला ' किंवा 'बापाला अंगभर कोड आणि आलेत मुलगी सांगून वेडे नाही आम्ही!' असे उद्गार अनुवांशिकतेची अस्पष्ट जाण असल्याचेच निर्देशक आहेत. कुत्रा कुत्रीच्या समागमातून कुत्रेच निर्माण होतात, है गंभीरपणे सांगितले तर लोक हसतील. पण थांबा. ससा आणि कोंबडी यांच्या समा- गमातून काय निर्माण होईल ? हा नुसता तर्कशास्त्रातला प्रश्न नाही. असा एक प्रेम- संबंध एकोणिसाव्या शतकात पॅरिसमधे निरीक्षकांनी नोंदवून ठेवला आहे. ती कोंबडी त्या सशाशिवाय दुसऱ्या प्राण्याला जवळच येऊ द्यायची नाही. सगळे मोठ्या कुतु- लाने त्या जोडप्यावर लक्ष ठेवून होते. मग त्या कोंबडीने घातले अंडे. या अंड्यातून काय बाहेर येणार ! ससा का कोंबडी का कोसा का संबडी ! पण हाय ! ते अंडे जागच्या जागीच कुजून गेले. सशाचे शुक्रजंतू कोंबडीच्या अंड्याला फलित करू शकत नाहीत. हीच जीवशास्त्रातील 'जात' (स्पिसीज ) या शब्दाची व्याख्या. जे नरमादी एकत्र येऊन पुनरुत्पत्ती करू शकतात त्यांची जात एक गोरा साहेब आणि काळा नेटिव्ह हे एकाच जातीचे हे सिद्ध करणारा मिश्र समाज जगभर पूर्वीच्या वसाहतीमध्ये दिसतो, हिंदू-मुस्लिमही या अर्थाने एकाच जातींचे. ('स्पीसीज 'च्या या व्याख्येला थोडी मर्यादा आहे. घोडा आणि गाढव या दोन जातीच्या प्राण्यांपासून अपश्य घडू शकते. परंतु ते बांझ असते. त्याला पुढे वंश नाही.) कुतुहलाची गोष्ट

घेवडे, घुंगुरटी आणि घोटाळे / २९