पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शनिवारी अर्धी सुट्टी आणि अशा अनेक सोयी तेव्हा होत्या. त्या मिळवायला औद्योगिक क्रांतीनंतरच्या कामगारांना प्रचंड लढे द्यावे लागले.
 या रचनेला पुढे केंद्रीय राजसत्तेने तुडवले. केंद्रीय सत्तेला आव्हान देईल असे कोणतही स्वावलंबी संघटन शिल्लक राहू दिले गेले नाही. ग्रामसभा संपल्या. न्याय- पंचायती गेल्या. गिल्डस गेल्या. कामगार संघटना पुढची ४०० वर्षे बेकायदा होत्या. सर्व जबाबदाऱ्या केंद्रसत्तेने अंगावर घेतल्या. यातून आला अनिबंध अप्पलपोटेपणा. आपला पेशा, आपला गाव यांच्याबाबत आपण काही देणे लागतो ही भावना गेली. शेजारी आजारी पडलाय ? धर्मादाय इस्पितळाकडे बोट दाखवा. मारामारी चालली आहे ? पोलिस बघून घेतील. असे त्रयस्यासारखे वागणारा माणूस आधी गुन्हेगार मानला जायचा. आता कर दिला की कर्तव्य संपले. पूर्वीच्या जमान्यात माणसे जेवायला बसण्यापूर्वी आजूबाजूला कोणी भुकेला आहे का हे पाहायची, त्याला पंक्तीला बोलवायची. आता ते शक्य नाही. अर्थशास्त्र आणि उत्क्रांतीचे जीवशास्त्र यालाच खतपाणी घालते. ज्याचा तो. लढा आणि मिळवा. बळी तो कान पिळी. असले सिद्धांत. आणि याला म्हणायचे विकास.
 या काळवंडलेल्या परिस्थितीतून सहकाराचा वेळ पुन्हा एकदा बहरेल आणि गगनापर्यंत जाईल असा दुर्दम्य आशावाद क्रोपॉटकिनने व्यक्त केला आहे.

 उत्क्रांतिवादाच्या आधुनिक अभ्यासकांनी क्रोपॉटकिनच्या मताची कितपत दखल घेतली ? नावनिशीवार फारच क्वचित. मी संदर्भासाठी वापरलेल्या पुस्तकांपैकी थिओडोसिअस डोबझान्स्की याच्या 'मॅनकाइंड इव्हॉव्हिंग' या एकाच पुस्तकात क्रोपॉटकिनच्या नांवाचा उल्लेख आलेला आहे. पण प्राणिजीवनावरील त्याची निरीक्षणे इतर अभ्यासकांच्याही नजरेस आली होती. मात्र ही सर्व सहकारी कृती ही एका मूळ स्वार्थापोटीच घडते असे सिद्ध करण्याचा इतरांनी प्रयत्न केला. तो बव्हंशी यशस्वी झाला आहे. ती चर्चा पुढे ओघाओघाने येईलच. मानवी समाज- रचनेचा अन्वय लावण्याचे काम मात्र फार अवघड ठरले आहे. या क्षेत्रात अभ्यासक अजून चाचपडतच आहेत असे म्हटले पाहिजे. संस्कृतीच्या इतिहासाकडे उत्क्रांति- वादाच्या नजरेतून बघण्याचा प्रयत्न शेवटच्या दोन प्रकरणांमध्ये आपण करणार आहोत.

उत्क्रांतिवाद मुर्दाबाद / २७