पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वाढला, तेर एक दिवस साईसुट्टयो म्हणून हिशोबाच्या वह्या फाडून टाकायच्या आणि पुन्हा शून्यातून सुरुवात करायची. आपसात थोड्याबहुत मारामाच्या झाल्या तर कानाडोळा करायचा. पण बाजारच्या जागी, पाणवठ्याच्या वाटेवर, शेती हंगामाची कामे अडवून कोणी गुंडगिरी करू लागेल, तर कडक शिक्षा. मग तिथेही संयुक्तिक कारण का असेना. झगड्यात खून झाला तर शिक्षा काय द्यावी ? मेलेल्या माणसाच्या सर्व जबाबदान्या मारणाऱ्याच्या डोक्यावर ठेवायच्या. विधवेला त्याने बायको करून घ्यायची. मुलांचा सांभाळ करायचा. वगैरे.
 मध्ययुगीन युरोपात दहाव्या आणि अकराव्या शतकात, दोन सहकारी पद्धतीच्या सामाजिक संघटना अस्तित्वात आल्या. निरनिराळ्या व्यावसायिकांच्या गिल्डस् आणि स्वतंत्र शहरे. या काळात खेड्यांनी किंवा खेड्यांच्या गटांनी, पैशाला पासरी झालेल्या शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसून भुईला भार झालेल्या इनामदार - जहागिर - दारांच्या गढ्या उध्वस्त केल्या. स्वतःच्या रक्षणासाठी या शोषक लढवय्यांवर विसंबण्याऐवजी आपापल्या संरक्षक भिंती बांधल्या. मैत्रीसंघ स्थापन केले. ही रचना इतकी यशस्वी ठरली की, पुढच्या तीन ते चार शतकात युरोपचा चेहरामोहराच बदलून गेला. स्वातंत्र्य आणि समतेवर आधारलेल्या या समाजात सर्जनशीलता आभाळाला टेकली. उत्तमोत्तम बांधकामे उभी राहिली, कलाकृती तयार झाल्या. उद्योग बहरले, हा सांस्कृतिक वसंत कोण्या देवदूताने आणला नव्हता, एखाद्या सर्वशक्तिमान केंद्रीय सत्तेच्या कर्तृत्वाचा भाग नव्हता, तर सर्वसामान्य माणसाला बाव आणि स्फूर्ती मिळाल्याचा परिणाम होता.

 या शहरांमध्ये शारीरिक कामाला प्रतिष्ठा होती. कामाचा दर्जा उत्तम होता. प्रत्येकजण आपल्या सहकारी संघाचे नाव टिकवण्याकरता झटत होता. व्यापारात फक्त रास्त फायद्यालाच मुभा होती. अन्नधान्य, शेतमाल, उद्योगधंद्यांचा कच्चा माल एकत्र खरीदला जात असे. उत्पादनाची विक्रीसुद्धा संघामार्फत होत असे. मालक- नोकर संबंध नव्हताच. तज्ञ कुशल कामगार आणि शिकाऊ उमेदवार एवढाच फरक असे. ' कामातून आनंद मिळेल असेच त्याचे स्वरूप असले पाहिजे.' 'काम न करता दुसऱ्याच्या उत्पादनाचा वाटा कोणाला मिळणार नाही.' अशी आज स्वप्नाळू वाटणारी वाक्ये शहरांच्या नियमावल्यांमध्ये असतं. दिवसात कामाचे आठ तास,

२६ / नराचा नारायण