पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

यांचे उत्तम उदाहरण म्हणजे लांडगे आणि जंगली कुत्रे किंवा ढोल. हत्ती किंवा गेंडे वगळता इतर कोणत्याही प्राण्याला हे समूह - शिकारी नमवतात.
 सहकारामुळे संरक्षण होते, कमीत कमी कष्टात वंश वाढतो, स्थलांतर सोपे होते. शक्ती, चापल्य, धूर्तपणा यांमुळे एकेकट्या प्राण्याची प्रतिकूल परिस्थितीशी टक्कर देण्याची क्षमता वाढते हे खरे; पण सहकाराने जगणारे प्राणी बहुतेकदा इतरांपेक्षा काकणभर सरस ठरतात. अन्नासाठी स्पर्धा आहे असे गृहित धरले तरी तिचे स्वरूप एकमेकाच्या तोंडचा घास काढून घेणे एवढेच नव्हे. त्यापेक्षाही महत्त्वाचा प्रकार म्हणजे नेहमीच्या अन्नापेक्षा वेगळे पदार्थ खाण्याची क्षमता मिळवणे. जो प्राणी इतरांचे लक्ष नसलेले पदार्थ खाईल त्याला भरपूर मिळेल. म्हणजेच मर्यादित अन्न- साठ्याच्या मालकीसाठी स्पर्धा करण्यापेक्षा पर्यायी अन्नसाठ्याकडे मोहरे वळवणे हा जास्त श्रेयस्कर मार्ग आहे.

 माणसाच्या इतिहासातही, हेच सहकार्याचे तत्त्व समाजरचनेच्या उत्क्रांतीच्या मुळाशी दिसते. प्रत्येक आधुनिक संस्कृती जमात, खेडी, शहरे, राष्ट्र अशा पायऱ्यांमधून गेली. प्रत्येक अवस्थेमधे, आपसातील झगडे कमी व्हावेत, रक्तपात टळावा यासाठी अनुकूल ठरतील अशाच प्रकारे परंपरा, नीती, धर्म, न्यायसंस्था घडवल्या गेल्या. झगडे, लढाया, युद्धे झाली नाहीत असे नव्हे. पण इतिहासकारांनी, सनसनाटी बातम्या देणाऱ्या वृत्तपत्राप्रमाणेच, सामान्य जनतेच्या नेहमीच्या जीवनक्रमाऐवजी, कधीमधी घडणाऱ्या घटनांनाच महत्त्व दिले. झगडे आणि युद्धे याच समाजातील स्थित्यंतराची दिशा दाखवणाऱ्या घटना आहेत असा आभास उत्पन्न केला. वस्तुतः या सर्व काळात मानवी संस्कृतीवर कायमचा ठसा उमटवून टाकणारी कोणती गोष्ट असेल, तर सहकार कुटुंब, गोत्र ( क्लॅन), जमात अशा वाढत्या समूहाला कवेत घेणारा सहकार. या सहकाराला छेद देणारे अंतर्गत झगडे सोडवणारी न्यायव्यवस्था ही म्हणूनच दगडा- वरच्या रेघेसारख्या पक्क्या कायद्याचा कीस काढून कोण बरोबर कोण चूक हे ठरवणारी नव्हती. तिचा उद्देश, आपला इतिहास, आपल्या परंपरा यांची जाण असलेल्या बुजुर्गांनी समाजाचा गाडा रुळावरून घसरू न देणे हा होता. मालकीची कल्पना होती; पण लवचिक. जमिनीवर मालकी होती. पण ज्यांना जमीन नाही त्यांना ती द्यायलाच हवी. कर्जे फेडली पाहिजेत हे खरे. पण फारच कर्जबाजारीपणा

उत्क्रांतिवाद मुर्दाबाद / २५