पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सहकार हा उत्क्रांतीचाच एक मार्ग आहे. प्राण्यांच्या मुख्य कृती तीन. अन्न मिळवणे, जीवरक्षण आणि प्रजोत्पादन. अन्न मिळवण्यात स्वजातीयांबरोबर स्पर्धा काही वेळा होत असेल. पण जीवरक्षण आणि प्रजोत्पादन सहकार्याशिवाय अवघड आहेत.
 बरेच खेकडे पाठीवर उलट्या पडलेल्या आपल्या दोस्ताला उलटवून पुन्हा पायावर उभा करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करतात. एकाने कात टाकली तर त्याच्या मऊ लिबलिबीत अंगावर टणक कवच निर्माण होईपर्यंत कात न टाकलेला दुसरा त्याची राखण करतो. एकत्र राहणाय्या दोन मुंग्या भेटल्या आणि एक जर भुकेली असेल, तर दुसरी पोटातून अन्नद्रव्य काढून तिला देते. मुंग्यांच्या आकाराच्या मानाने बघता त्यांची वारुळे ही माणसाच्या गगनचुंबी इमारतींना भारी आहेत. सहकाराने राहणाऱ्या मुंग्यांना खरक्षणासाठी इतर लटपटी कराव्या लागत नाहीत. त्यांचे रंग, त्यांची वारुळे उठून दिसतात. त्यांची अंडी, अळया यांचे इतरांना भक्ष्य म्हणून आकर्षण वाटते. त्यांच्या अंगावर संरक्षणकवचही नसते. पण त्यांची शिकार करायला फारसे कोणी धजावत नाही. उलट इतर कीटकांना त्यांची भीतीच वाटते. पिशवीतून मुंग्या गवतात सोडल्या तर नाकतोडे, रातकिडे, कोळी पळून जातात.
 पेलिकन पक्षी गटाने शिकार करतात. अर्धवर्तुळ करून ते माशांना काठाकडे ढकलत नेतात. अरुंद पात्राच्या नद्यांमध्ये ते दोन तुकड्या करून अर्धे वरच्या बाजूने तर अ खालच्या बाजूने येऊन कोंडीत मासे अडवतात. डॉल्फिन किंवा पॉरपॉइज हे जलचरसुद्धा मासळीची अशीच शिकार करतात.
 थंड प्रदेशातले अनेक पक्षी हिवाळ्याचा कडाका पडू लागला की, उबदार हवेच्या प्रदेशाकडे स्थलांतर करतात. स्थलांतराची वेळ झाली, की एरवी विखुरलेले पक्षी हजारोंच्या संख्येने एकत्र येतात. सराव म्हणून छोट्या छोट्या सफरी करतात. शेवटी हे प्रचंड तांडे शेकडो, हजारो मैल प्रवास करून नेमक्या जागी पोचतात आणि बरेचदा विणीच्या हंगामात आपल्या आदल्या वर्षी वापरलेल्या घरट्यातच पुन्हा अंडी घालतात. पेंग्विन पक्षी अगदी चारसहा दिवसांच्या फरकाने, म्हणजे जवळजवळ एकदमच सर्वजण मिळून अंडी घालतात.

 सस्तन प्राणीसुद्धा सहकाराने जगतात. हरीण, गवे, जंगली मेंढ्या, हत्ती किती- तरी प्राणी कळपात रहातात. शिकारी सस्तन प्राणीसुद्धा सहकाराचा मार्ग धरतात.

२४ / नराचा नारायणं