पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

युरोपात पळून गेला. फ्रान्समध्ये तीन वर्षे तुरुंगात काढल्यानंतर १८८५ च्यां सुमारास इंग्लंडमध्ये गेला आणि पुढची तीस वर्षे इंग्लंडमध्ये राहिला. सोवियत क्रांतीनंतर तो रशियात परतला. बोल्शेविक सरकारने स्टालिनच्या आधिपत्याखाली विक्राळ दमनयंत्राचे स्वरूप धारण करण्यापूर्वीच कोपॉटकिनचे देहावसान झाले. त्याच्या मृत्यूनंतर अॅनार्किस्ट किंवा मुक्तिवादी मंडळीनी मॉस्कोत काढलेला मूकमोर्चा ही रशियात विरोधी पक्षांनी केलेली अखेरची उघडपणे संघटित अशी कृती आहे असे म्हणतात.
 कोपॉटकिनने आयुष्यभर विविध विषयांवर विपुल लिखाण केले. दमन करणाऱ्या केंद्रीभूत शासनयंत्रणेपेक्षा सहकाराधिष्ठित विकेंद्रित समाजरचना हीच जास्त स्वागतार्ह आहे आणि क्रांतीनंतर रशियात ती तशीच घडवली पाहिजे हा अत्यंत ढोबळमानाने क्रोपॉटकिनच्या 'अॅनार्किसम 'चा अर्थ होता. म्हणूनच त्याला अराजक- वाद हा मराठी प्रतिशब्द चुकीचा आहे. क्रोपॉट किनच्या या मांडणीचे महात्मा गांधींना अन् सर्वोदयवाद्यांना बरेच आकर्षण वाटले. क्रोपॉटकिन विषयी बाबा भामट्यांनी काढलेल्या काही सूचक उद्गारांमुळे मला त्याचे मूळ लिखाण काढून वाचावेसे वाटले. या ठिकाणी त्याच्या 'म्यूचुअल एड' या पुस्तकाचा आढावा घेऊन त्यातून उत्क्रांति- वादावर कोणता प्रकाश पडतो हे पाहायचे आहे.

 जगण्यासाठी झगडा हे प्राणिजीवनाचे सर्वंकष सत्य आहे, अन् त्यातूनच उत्क्रांतीचा गाडा पुढे रेटला जातो हे क्रोपॉटकिनला मान्य होते. प्रश्न होता तो या झगड्याचे स्वरूप काय याबद्दल. हक्सलेच्या मते एक स्वतःचे कुटुंब सोडले, तर संपर्कात येणाऱ्या इतर सर्वांशी प्राणी कायम लढतच असतो. मग ते स्वजातीय असोत की परजातीय, हॉब्जने वर्णिलेली हीच सततची युद्धस्थिती. उलट क्रोपॉटकिनला प्राणी एकमेकाला सतत ( पोटावर, पाठीवर किंवा जीवे) मारत असतात हे मान्य नाही. एका जातीच्या प्राण्यांचे हितसंबंध दुसऱ्या जातींच्या प्राण्यांविरुद्ध असू शकतात. परंतु एका जातीच्या वा एका गटात राहणान्या प्राण्यांचे मात्र एकमेकांशी सहकार्यच असते. झगड्याइतकाच सहकार हासुद्धा निसर्गनियमच आहे. जीवनाच्या खटपटीत कोण यशस्वी होते ? तर निस्संशय सहकार्याने वागणारे प्राणी. ते जास्त काळ जगतात, त्यांच्या शरीराच्या आणि बुद्धीच्या विकासाला जास्त संधी मिळते.

उत्क्रांतिवाद मुर्दाबाद / २३