पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तत्कालीन, विशेषतः अमेरिकेतील धनिकवर्गामध्ये फार लोकप्रिय झाला. त्यांना अगदी हायसे वाटले. कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात अपराधीपणाची भावना असलीच, तर ती संपून गेली. ते यशस्वी होते. ते सर्वोत्तम होते. ते डार्विनच्या नियमांना धरूनच वागत होते. इतर गरीब होते कारण त्यांची लायकीच तेवढी. शिवाय स्पेन्सरने स्पष्टपणे सांगितले की, या रचनेत हस्तक्षेप करण्यामुळे गरिबांचे तर भले होणार नाहीच, पण समाजाची प्रगती थांबेल स्पेन्सरच्या शब्दांत सांगायचे तर 'मागास प्राण्यांची विल्हेवाट लावून इतरांना परिस्थितीच्या वरवंट्याखाली रगडवून निसर्ग प्राण्यांना घडवतो. त्यांना परिस्थितीशी जमवून घ्यायला लावतो. अडाणीपणाला योग्य शिक्षा होऊ दिली नाही, तर उत्कर्ष थांबलाच मूर्खपणा आणि शहाणपणा यांना सारखीच किंमत असेल, तर शहाणे बनण्याचे कष्ट कोण घेईल ? ' थोडक्यात शासनाने श्रीमंतांना लगाम घालणे व्यर्थ आहे, नव्हे देशहितविरोधी आहे.

 स्पेन्सरच्या कल्पना अर्थशास्त्रज्ञ पूर्णपणे अमान्य करतात. शिवाय त्यांना उत्क्रांतिवाद हे नाव देणे अगदी चूक आहे. उत्क्रांतिवाद हा अनुवांशिक गुणांच्या प्रसाराशी संबंधित आहे. संपत्तीशी नव्हे. उत्क्रांतिवादात एखाद्या गुणधर्माच्या यशस्वितेचे गमक म्हणजे त्या गुणाचा अधिकाधिक प्रसार होणे. गुण अंगी असणाऱ्या प्राण्यांची संख्या आणि प्रमाण वाढणे. या निकषावर पाहिले तर गरीबच यशस्वी ठरतात. कारण त्यांचे प्रमाण खूपच जास्त आहे. शेवटी उत्क्रांतिवादात किंवा इतर कोणत्याही वैज्ञानिक सिद्धांतामधे मूल्यविचार अभिप्रेत नसतो. हे सिद्धांत म्हणजे निसर्गात वस्तुस्थिती काय आहे व ती तशी का आहे हे समजावून घेण्याच्या मार्गातील टप्पे होतं. ' स्थिती कशी असली पाहिजे ?' या प्रश्नाला त्यांच्यात उत्तर शोधलेले नाही. आर्थिक क्षेत्रात समता किंवा किमान विषमता किंवा समानसंधी असे आदर्श आपण समोर ठेवू शकतो. ते गाठण्यासाठी काय केले पाहिजे हे सम- जण्याकरता वस्तुस्थितीची मीमांसा आणि चिकित्सा वापरायची असते. प्राण्यांची, वनस्पतींची, माणसांचीसुद्धा आपल्याला अभिप्रेत आदर्श प्रत्यक्षात आणण्याकरता कशी घडण करायला हवी असा विचार करता येईल. नव्हे करायलाच हवा. ती चर्चा पुढे सुप्रजाजनन या प्रकरणात करू. पण आर्थिक विषमतेच्या पुरस्काराला उत्क्रांति- वादाचा मुखवटा चढवून स्पेन्सरने डार्विनवर कमालीचा अन्याय केला हे निश्चित.

उत्क्रांतिवाद मुर्दाबाद / २१