पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मन, भाषा, कला ही सर्व उत्क्रांत होत असतात, सगळ्या गोष्टी प्रथम साध्या, सोप्या असतात आणि उत्क्रांतीतून अधिकाधिक गुंतागुंतीच्या होत जातात. प्रथम गोंधळ असतो, मग सुसंघटित रचना दिसते. प्रथम प्रत्येक भाग आपापल्या मार्गाने जातो. नंतर परस्परावलंबन निर्माण होते. प्रथम सगळे सारखे असतात. मग खासियत, स्पेशलायझेशन सुख होते. यालाच सार्वत्रिक उत्क्रांती म्हणायचे.
 या मांडणीत फार घोटाळे आहेत. उत्क्रांती आणि विकास यांची गल्लत झाली आहे. गर्भाचे बालकात रूपांतर होण्याला आपण विकास म्हणतो. उत्क्रांती नव्हे. सूर्य- मंडल, पृथ्वी यांच्यातील बदलांनाही विकासच म्हटले पाहिजे. जिवांच्या एका जातीत विशिष्ट गुणधर्माचे 'प्रमाण' कमीजास्त होणे हा उत्क्रांतीचा अर्थ आहे. वेगवेगळ्या प्रक्रियांना उत्क्रांती हे एकच नाव देण्यातून काही साध्य होत नाही. त्यातल्या कोणत्याही प्रक्रियेबद्दलची आपली जाण जास्त सखोल होत नाही.
 स्पेन्सरचे पूरकता तत्रही असेच आहे. ते त्याला सर्वत्र दिसते. नर आणि मादी, धन आणि ऋण विद्युत्भार, रोगाचे जंतू आणि त्यांना मारणारे जंतू. यात दोन गोष्टी परस्परविरोधी, परस्परपूरक असणे यापलिकडे कोणताच सारखेपणा नाही. आज स्पेन्सरच्या या संकल्पनांना विज्ञानात स्थान नाही. समाजाच्या संघटनेबद्दल त्याने मांडलेले विचार मात्र काही समाजशास्त्रज्ञांना अजून उपयुक्त वाटतात.

 स्पेन्सरने डार्विनच्या नावाचा सामाजिक क्षेत्रात केलेला वापर उत्क्रांतिवादाबद्दल गैरसमज निर्माण करण्याला कारणीभूत झाला. तो ठामपणे सांगत असे की, मी डार्वि- नचीच मते मानवी समाजाला लागू करत आहे. समाजात सगळ्यांनाच जगण्यासाठी झटावे, झगडावे लागते. ज्यांना हे चांगले जमते, ते यशस्वी होतात. समाजातले हे गुणवान लोक, यशस्वी स्पर्धक. या मांडणीला लोक सोशल डार्विनिझम असेच म्हणू लागले. स्पेन्सरपूर्वी समाजातील स्पर्धेचा विचार मुख्यतः अर्थतज्ञ करत असत. अठराव्या शतकात अॅडम स्मिथ याने प्रतिपादन केले होते की, प्रत्येक नागरिक आपापल्या फायद्याकरता झटेल तर समृद्धी येईल. भरपूर उत्पादनासाठी प्रत्येक माणसाने, गटाने किंवा राष्ट्राने सर्वात जास्त नैपुण्य असलेल्या उद्योगात गुंतून राहायला हवे. याकरता डिव्हिजन ऑफ लेबर, कामाची वाटणी करायला हवी. आपल्याला जे जे उत्पादन उत्तमपणे करता येते ते ते करून त्याच्या बदली

उत्क्रांतिवाद मुर्दाबाद / १९