पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शाळेत भिंतीवर चिकटवता येणार नाहीत.
 हा कायदा बायबल शिकवा असे म्हणत नाही. पण तथाकथित क्रिएशन सायन्स- मधे बायबलमधील शिकवणुकीपलीकडे काहीही नाही. क्रिएशन सायन्स हे विज्ञान नाही. विज्ञानाला निसर्गाचे नियम शोधायचे आहेत. विज्ञानात प्रत्येक गोष्टीचा अर्थ त्या नियमांतून लावला जातो. विज्ञानातील विचार अनुभवसिद्ध असावे लागतात, श्रद्धा आणि विश्वास यांवर आधारित असून चालत नाहीत. विज्ञानाला प्रयोगप्रामाण्य मान्य हवे, ग्रंथप्रामाण्य नव्हे. शिवाय वैज्ञानिक ज्याचा अभ्यास करतात ते विज्ञान अशी एक व्यावहारिक भूमिका घेता येईल. कोणत्याही वैज्ञानिक मासिकात क्रिएशन सायन्सवरील लिखाण छापले जात नाही.

 सरकारपक्षातर्फे काही शिक्षणतज्ञांनी मत मांडले की, शाळेच्या अभ्यासक्रमाला पालकांचा पाठिंबा आवश्यक आहे आणि बहुसंख्य पालक क्रिएशन सायन्सला अनुकूल आहेत. यावर न्यायाधीशांनी ठणकावून सांगितले की, अमेरिकन राज्य- घटनेच्या पहिल्या दुरुस्ती अन्वये नागरिकांना मिळालेला विचारस्वातंत्र्याचा हक्क बहुमताच्या जोरावर बाजूला सारता येणार नाही. किती पालकांना क्रिएशन सायन्स मान्य आहे याचा इथे संबंधच नाही. सार्वजनिक शाळा या शासनयंत्रणेचा महत्त्वाचा भाग आहेत. त्यांच्या माध्यमातून एका गटाला, तो कितीही मोठा का असेना, इत- रांवर आपली धार्मिक मते लादता येणार नाहीत. सरकारतर्फे चंद्र विक्रमसिंघे या सिलोनी शास्त्रज्ञाची साक्ष काढण्यात आली. खरे तर हा मनुष्य क्रिएशन सायन्सला मुळीच अनुकूल नव्हता. तो म्हणाला की, पृथ्वीचे वय फक्त सहा हजार वर्षे आहे हे मत डोके ठिकाणावर असलेला कोणताही वैज्ञानिक मान्य करू शकणार नाही. असा साक्षीदार आणल्याबद्दल न्यायाधीशांनी आश्चर्य व्यक्त केले. मेख अशी होती, की फ्रेड हॉइल (हॉइल - नारळीकर सिद्धांताच्या प्रसिद्धीमुळे महाराष्ट्राला माहीत झालेले गणिती खगोलशास्त्रज्ञ आणि कादंबरीकार ) आणि चंद्र विक्रमसिंघे यांनी १९७९ साली 'डिसिझेस फॉम स्पेस' या नावाचे पुस्तक लिहिले. त्यात त्यांनी कल्पना मांडली की, आदिकालापासून पृथ्वीवर धूमकेतूंवरून सूक्ष्मजीवांचा प्रवेश होत राहिला. उत्क्रांतीसुद्धा बरीचशी त्यांच्यामुळेच झाली असावी. या कल्पना अर्थात आजवरच्या उत्क्रांतिवादाच्या मांडणीला धक्का देणाऱ्या आहेत. त्यामुळे क्रिएशन सायन्सच्या

१६ / नराचा नारायण