पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कोर्टकचेन्या करणे असे प्रकार झाले.
 पाऊणशे वर्षांपूर्वी टेनेसी राज्यात शाळांमधे उत्क्रांतिवाद शिकवायला बंदी घालण्यात आली. १९२५ साली डेटन या गावात स्कोपस नावाच्या विज्ञान शिक्षका- विरुद्ध, हा कायदा मोडून डार्विनचा दृष्टिकोन शिकवण्याबद्दल खटला भरण्यात आला. आरोप सिद्ध झाला. पण असला कायदा राबवण्याबद्दल टेनेसी राज्याची देशभर छीथू झाली. अजूनही हा कायदा अस्तित्वात आहे. पण पाळला जात नाही. १९२९ साली आर्कन्सा राज्यातही असाच कायदा झाला. या कटकटीमुळे जीवशास्त्राची शालेय पाठ्यपुस्तके लिहिणारी मंडळी उत्क्रांतिवादापासून चार हात दूर राहू लागली. हा प्रकार अगदी २५ वर्षांपूर्वीपर्यंत चालू होता. १९५७ साली स्पुटनिक हा बालचंद्र आकाशात पाठवून सोवियत रशियाने जगाला चकित केले. स्वतःला विज्ञान आणि तंत्रज्ञान यात अग्रभागी मानणाऱ्या अमेरिकेला मोठाच धक्का बसला. आपण का मागे पडलो याचा सर्वजण विचार करू लागले. देशाच्या प्रत्येक धोरणाची फेर- तपासणी होऊ लागली. त्यात विज्ञान शिक्षणाचाही पुनर्विचार झाला. नॅशनल सायन्स फौंडेशन या संस्थेने तज्ञांकरवी शाळांकरता आदर्श विज्ञान अभ्यासक्रम तयार करवून घेतला. जीवशास्त्राच्या आदर्श अभ्यासक्रमात तज्ञांनी उत्क्रांतिवादाला महत्त्वाचे स्थान दिले. आज निम्म्या अधिक शाळा या अभ्यासक्रमानुसार लिहिलेली पुस्तके वापर- तात. उरलेल्यांमधेसुद्धा बव्हंशी हाच अभ्यासक्रम पुरस्कारला जातो.
 याची प्रतिक्रिया म्हणून असेल कदाचित, पण १९६० पासून. बायबलवादी मंडळींनी पुन्हा संघटित व्हायला सुरुवात केली. त्यातून क्रिएशन सायन्स हा नवा वाक्प्रचार रूढ झाला. त्याचा थोडक्यात अर्थ म्हणजे उत्क्रांतिवादाऐवजी बायबलमधे सांगितलेली मांडणी मान्य करणे. या 'नव्या' विज्ञानाचा पाठपुरावा करण्यासाठी इन्स्टिट्यूट फॉर क्रिएशन रीसर्च, सान डिएगो यासारख्या संस्था निर्माण झाल्या. यांची डार्विनवरची टीका मोठी जहरीली असते. उत्क्रांतिवाद हा बायबलविरोधी, ख्रिस्तविरोधी, पूर्णपणे अशास्त्रीय असा सिद्धांत आहे. निरीश्वरवादी, समाजवादी, फॅसिस्ट आणि इतर अनेक खोट्या आणि धोकादायक तत्त्वज्ञानांना उत्क्रांतिवादातून मदत झाली आहे. ही अन् अशी मते मांडली जातात.

 क्रिएशन रिसर्च सोसायटी ही अशीच एक संस्था. तिच्या सदस्यत्वासाठी पुढील

१४ / नराचा नारायणं