पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आढळते. या चर्चेत दोन काहीशा परस्परविरोधी कल्पना मांडल्या आहेत असे दिसते. इथे जेनेसिसमधल्या मजकुराचा संक्षिप्त आणि थोडा स्वैर अनुवाद देत आहे. पहिल्या कल्पनेप्रमाणे 'सुरुवातीला ' परमेश्वराने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली. नंतर प्रकाश आणि अंधार वेगवेगळे केले. दुसऱ्या दिवशी त्याने स्वर्ग घडवला. तिसऱ्या दिवशी समुद्र, पृथ्वी, गवत आणि फळझाडे बनवली. चौथ्या दिवशी सूर्य आणि तारे बनवले. पाचव्या दिवशी जलचर आणि पक्षी बनवले. सहाव्या दिवशी स्थलचर प्राणिसृष्टी बनली. परमेश्वर म्हणाला, की मी आता माझ्या प्रति- बिंबातून मनुष्य घडवतो. तो सर्व जीवांवर सत्ता गाजवेल. मग परमेश्वराने पुरुष आणि स्त्री बनवले. आता त्याचे काम संपले. सातव्या दिवशी त्याने आराम केला. दुसरी कल्पना दुसऱ्या प्रकरणात दिलेली आहे. ती अशी : 'पृथ्वीवर धुके निर्माण झाले. त्यातून जमीन चिंब भिजली. परमेश्वराने मातीतून मानव घडवला. पूर्वेला ईडनमधे झाडे लावली आणि मानवाला तिथे नेऊन ठेवले. जमिनीतून देखणी आणि अन्नदाती झाडे वर आली. परमेश्वराने मातीतून प्राणी आणि पक्षी घडवले. पण अॅडम एकटाच होता. परमेश्वराने त्याला झोपवले. त्याची एक बरगडी काढून घेतली. तिच्या- पासून स्त्री बनवली आणि ती अॅडमला देऊन टाकली. '

 अनेक डार्विनकालीन मंडळींच्या मते ही वर्णने शब्दशः खरी आहेत. बायबलच ईश्वराने निर्माण केलेले असल्यामुळे त्यातला प्रत्येक शब्द खरा आहे. ख्रिस्ताचा जन्म त्याच्या मातेचा कोणत्याही पुरुषाशी समागम न होता झाला. खिस्त मेल्यावर पुन्हा एकदा जिवंत झाला. सर्व माणसे कयामतच्या दिवशी परमेश्वरापुढे आपल्या कृतीचा जाब चायला जातील. या सर्व गोष्टी अक्षरशः सत्य आहेत. एका धर्मपंडिताने बायबल- मधील लिखाणावरून हिशोब करून सांगितले की पृथ्वीचे वय सहा हजार वर्षे इतकेच आहे. ( भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते हा आकडा ४०० कोटी वर्षे असा हवा. ) या सर्वांच्या भावना उत्क्रांतिवादाने जबर दुखावल्या गेल्या. अशा पाखंडी विज्ञानामुळे समाजाचे अधःपतन होईल अशी भीती सर्वांना वाटू लागली. या भूमिकेला फंडामेटॅ- लिझम असे म्हणण्याचा प्रघात आहे. डार्विनच्या मातृभूमीमधे या विचारांचा फारसा पगडा उरलेला दिसत नाही. उत्तर अमेरिकेमधे मात्र अजूनही बरेच लोकमत डार्विन - विरोधी आहे. या संदर्भात विसाव्या शतकात बरेचदा कायदे करणे, मोडणे,

उत्क्रांतिवाद मुर्दाबाद / १३