पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हा अनुवांशिक गुणधर्म असेल, तर हरणांमधे मंदगती हा गुणधर्म पुढच्या पिढीला जाणार नाही. एका पिढीतून पुढच्या पिढीत जाताना अनुकूल गुणधर्म राखले जातात, तर प्रतिकूल गुणधर्म चाळणी लावल्यासारखे काढून टाकले जातात. शेतकरी बियाण्यासाठी टपोरे जड दाणे बेचून काढतो. त्यामुळे पुढच्या पिकात टपोरेपणा जास्त आणि हलकेपणा कमी यावा अशी कल्पना असते. ही मानवाने केलेली निवड. ज्या आंब्याची चव गोड, ज्याला गर भरपूर, ज्याचा खाद उत्तम त्याच्या कोयी जो तो नेऊन लावणार. म्हणजे याच गुणांचा प्रसार होणार. ज्या कोंबड्या भरपूर अंडी देतात त्या ठेवायच्या, त्यांची पिल्लं जोपासायची. उलट ज्या कमी अंडी देतात त्या कापून खायच्या. असे केले तर दर पिढीला अंडी जास्त देणाऱ्या कोंबड्यांचे प्रमाण वाढणार. याला म्हणायचे सिलेक्शन. माणसाने केले तर ते कृत्रिम सिलेक्शन. परि- स्थितीच्या रेट्याने आपोआप झाले, तर ते नैसर्गिक सिलेक्शन. सूत्ररूपाने आपण असे म्हणू की, निसर्गाला किंवा परिस्थितीला अनुरूप प्राण्यांची वंशवृद्धी जास्त होते. परिस्थिती फिरली तर वंशवृद्धीची चक्रेसुद्धा उलटी फिरू लागतात.

 याचे एक प्रसिद्ध उदाहरण म्हणजे इंग्लंडमधल्या पेपर्ड मॉथ या पतंगाची कहाणी. याचा नेहमीचा रंग पांढरा आणि वर काळे ठिपके. क्वचित काळ्या रंगाचे पतंगसुद्धा पैदा होतात. पण त्यांचे प्रमाण पूर्वी खूपच कमी दिसे. औद्योगिक क्रांतीनंतर मात्र पांढया पतंगांचे प्रमाण घटून काळ्यांचे वाढले. असे का झाले असेल याचे उत्तर तज्ञांना परिस्थितीतील बदलात सापडले. या पतंगांवर छोटे पक्षी ताव मारतात. पूर्वी झाडांची साल पांढरट रंगाची असल्यास तिथे बसणारे काळे पतंग उठून दिसायचे अन् पक्षी सहज त्यांची शिकार करायचे. औद्योगिक क्रांतीनंतर कारखान्यांच्या धुराड्या- वून बाहेर पडणाऱ्या कोळशांच्या कणांमुळे सगळा आसमंतच काळवंडला. त्यात झाडांची सालही काळी पडली. आता काळे पतंग सहज लपून जाऊ लागले, पांढरे उठून दिसू लागले. त्यांची शिकार जास्त प्रमाणात होऊ लागली. केटल्वेल् नावाच्या शास्त्रज्ञाने ही गोष्ट एका प्रयोगातून मोठ्या सफाईने सिद्ध केली. त्याने एका भागात ५८४, पतंग मोकळे सोडले. त्यातील ७१% ( ४१६) काळे व २९% ( १६८ ) पांढरे होते. काही काळानंतर रात्री मशाली पेटवून वगैरे, त्याने ( १४१ ) पतंग पकडले. त्यात ८४% (११६) काळे व १६% (२२) पांढरे होते. म्हणजे

१० / नराचा नारायण