पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सगळे एका जातीचे. पण सगळे कुत्रे, सगळी कासवे, सगळी माणसे सारखी कुठे असतात ? काही उंच, काही बुटके, काही रोगिष्ट, काही निरोगी, काही लुकडे, काही लट्ट, काही हुशार, काही मट्ठ, काही गोरे, काही काळे कितीतरी फरक. या ढोबळ फरकांव्यतिरिक्त बारकाव्यातले फरक कितीतरी जास्त. कोणाचे रक्त ए गटाचे तर कोणाचे बी गटाचे. कोणाचे ओ तर कोणाचे एबी. या आणि अशा फरकांचा परिणाम म्हणजे परिस्थितीच्या रेट्यातून आणि मृत्यूच्या वरवंट्यातून काहींना मार्ग निघतो. बाकीच्यांना नाही, कासवाची जी पिल्ले वेगाने पळतील तीच पक्ष्यांच्या तावडीतून सुटण्याची शक्यता. जी हळू असतील ती साहजिकच जगणार नाहीत. इथे दयामाया नाही. कोंबडीच्या पिल्लाला अळी सापडली, तर चोचीत पकडून ते कसे धावते पाहिलेयत तुम्ही? ते धावले नाही तर दुसरे पिल्लू ती अळी हिसकावून घेणार. सस्तन प्राण्याचे जे पिल्लू जन्मतः अशक्त असेल, दूध ओढू शकत नसेल ते मरणार. बाल्यावस्थेतून प्रौढावस्थेत गेल्यावरही स्पर्धा संपत नाही. अन्न मिळवण्या- साठी तर स्पर्धा आहेच. भक्षकापासून वाचण्यासाठीही स्पर्धा आहे. जे हरीण वेगाने पळणार नाही ते वाघाच्या तावडीत सापडणार. शिवाय नरांची मादी मिळवण्यासाठी स्पर्धा आहे, तर माद्यांची नर मिळवण्यासाठी स्पर्धा. व्यंकटेश माडगुळकरांचे 'सत्तांतर ' हे पुस्तक वाचलेय का तुम्ही ? माकडांमधे माद्यांचा दादला होण्यासाठी जीवघेणी स्पर्धा असते. अशक्त नराला दुसरा स्पर्धक मारून टाकतो. त्याच्या पिल्लांना- सुद्धा मारतो. सिंहाच्या एकत्र कुटुंबातील नरांना इतर स्पर्धक संधी मिळताच हुसकावून लावतात. पिल्लांना मारतात आणि माद्यांबरोबर नवीन संसार सुरू करतात, म्हणजे फक्त शक्तिवान नरांनाच वंशवृद्धी करता येते. बाकीच्यांना गप्प बसावे लागते. गवळण पक्ष्याचे बाभळीच्या झाडाला टांगलेले घरटे आपण सर्वजण पाहतो. नर घरटे विणतो. मादी घरटे तपासून मग नराला पसंत करते. ज्या नराला चांगले घरटे विणता येत नाही, त्याला मादी मिळत नाही. त्याचा वंश वाढत नाही.

 ४. वंशवृद्धी : जे प्राणी बालपणातच मरतात त्यांचा वंश संपतोच. जे मोठे होतात पण विरुद्ध लिंगी साथीदार मिळवू शकत नाहीत, त्यांचीही वंशवृद्धी होत नाही. वंश- वृद्धीचे महत्त्व असे, की याच मार्गाने गुणधर्म पुढच्या पिढीला पोचतात. खाण तशी माती. जे जीवनाच्या झगड्यात तरतात, त्यांच्याच प्रकारची पुढची पिढी होते. गंती

रगेल तोच तगेल / ९