पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वेगळेच बीसुद्धा आले आणि ही वनस्पती वणव्यासारखी पसरली, मिळेल ती सर्व मोकळी जागा व्यापून दशांगुळे उरली. या वनस्पतीला आपण चटकचांदणी, गाजर गवत, काँग्रेस गवत अशा नावांनी ओळखतो. तिला रोखण्यासाठी आता मोहिमा काढाव्या लागतात.
 एकोणीसाव्या शतकात माल्थस या ब्रिटिश अभ्यासकाने माणसांच्या बाबतीत असेच भाकित केले. डेव्हिड रिकार्डो या अर्थतज्ञाने तर असे सांगितले की शेत- मजुरांची मजुरी वाढवण्यात अर्थ नाही. कारण जास्त मजुरी दिली की लगेच लेकुरे उदंड होणार, मजुरांचा पुरवठा वाढणार आणि पुन्हा मजुरीची पातळी खाली येणार.
 २. मर्यादित पुनरुत्पत्ती : या सगळ्या जननक्षमतेचा फारच थोडा हिस्सा प्रत्यक्षात उतरताना दिसतो. माशांची लक्षावधी अंडी पाण्यात तरंगत असतात, तेव्हा त्यातली बरीचशी दुसरे मासेच मटकावतात. सागरातली महाकाय कासवे किनाऱ्यावर येऊन खड्डा खणून शेकडो अंडी आत टाकतात अन् खड्डा बुजवून निघून जातात. त्यातून बाहेर येणारी शेकडो पिल्ले तडक पाण्याकडे धावत सुटतात. पण त्यांची वाट पाहात गिधाडे, कावळे व इतर मक्षक पक्षी, सरडे, खेकडे असे प्राणी थांबलेले असतात. त्यांची मेजवानी सुरू होते. या सर्वांच्या तावडीतून एक टक्का तरी पिल्ले पाण्यापर्यंत पोचतात की नाही कोण जाणे. माणसे तर कासवाने अंडी घालायला सुरुवात केली की त्याच्या शेपटीखाली पातेले धरतात आणि गरमागरम अंडी लगेच खायला घेऊन जातात. हल्ली शेतकरी कीटकनाशके वापरायला लागल्यापासून ती पोटात जाऊन पक्ष्यांना अपाय होतो. त्यांच्या अंड्यांचे कवच नीट घट्ट घडत नाही, अंडे सहज फुटून जाते आणि जीव मरतो. माणसांतही अगदी अलीकडेपर्यंत बालमृत्यू फार होते. आजसुद्धा भारताच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पंचवीस टक्के मुले तान्हेपणातच राम म्हणतात. मग आईबापही अगतिक आणि म्हणून उदासीन होतात. मुलाला दगड्या, धोंडा असली नावे देऊन यमाला फसवण्याचा फोल प्रयत्न करतात. माल्थसने गंभीर इशारा देऊन ठेवला होता की, आपण संख्या मर्यादित ठेवली नाही तर भूक, रोगराई, लढाया असंल्या मार्गाने ती घटवली जाईल.

 ३. एकाच जातीतील प्राण्यांमधील विविधता : इथे प्राण्याची जात हा शब्द 'स्पिसीज' या अर्थाने वापरला आहे. ज्यांचे आपसात लैंगिक संबंध सफल होतात ते

८ / नराचा नारायण