पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भरपूर असेल, आजार नसतील, भक्षक नसतील तर प्राणी किंवा वनस्पती कोणाचीही अक्षरशः वारेमाप वाढ होऊ शकते. हेरिंग आणि कॉडमासे लक्षावधी अंडी घालतात. गोगलगायी हजारो अंडी घालतात. ज्वारीच्या एका दाण्याचे रोप होते. तेव्हा येणाऱ्या कणसात शेकडो दाणे असतात. ते सगळे रुजले तर एका पिढीत एका रोपापासून शेकडो रोपे बनतील. कळक नावाचा बांबू सुमारे ४० वर्षांनी एकदा फुलावर येतो, तेव्हा त्याच्या प्रत्येक झाडाला सरासरी ५ लक्ष बिया येतात. माणसाचे प्रत्येक जोडपे ' चार मुलांना जन्म देते असे मानले, तर वीस पिठ्यांमधे त्या वंशात दहा लक्ष माणसे निर्माण होतील. आपल्याकडे गाईंच्या कृत्रिम रेतन ( आर्टिफिशिअल इनसेमिनेशन ) कार्यक्रमात परदेशी वळूचे शुक्रजंतू आणून गोठवून ठेवतात आणि एका वळूपासून वर्षानुवर्षे शेकडो गायी गाभण राहतात. स्त्री आयुष्यभर मुलं पैदा करण्याचा कार्यक्रमात गुंतली, तर वीस-पंचवीस मुलांची आई होऊ शकते. पुरुषाचे तर काय विचारायलाच नको. संधी मिळेल तितकी मुले ! असे म्हणतात की, चंगीजखानला साडेपाचशे मुले होती. फार लांब कशाला, धृतराष्ट्राला शंभर मुले होतीच ना. अर्थात ही सगळी गांधारीच्या पोटची असणे अवघड. तात्पर्य, निसर्गात प्रत्येक प्राण्याजवळ पिलावळ वाढवण्याची शक्ती जबरदस्त असते. आणि संधी मिळाल्यावर पिल्ले खरोखरच अफाट वाढतात.
 ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधे गोया साहेबाने १८३५ च्या आसपास ससे नेले. तिथे खायला गवत भरपूर आणि वर शिकारी प्राणी नाहीत. सुमारे ४० वर्षांनंतर न्यूझीलंडमधून सशांच्या कातड्यांची निर्यात सुरू झाली. त्यांची संख्या १८७३ साली ३३ हजार, १८७७ साली १० लाख, १८८२ साली ९० लाख, तर १९२५ साली २ कोटी इतकी प्रचंड होती. सशामुळे शेवटी मेंढ्याना चारा कमी पडू लागला. या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने जंग जंग पछाडले. शेवटी मिक्सोमाटो- सिस या सशांच्या रोगाचे जंतू आणले. पण त्यांचा प्रसार होईना. मग युरोपातून अशा प्रसारासाठी खास गोचिड्या आणल्या. तरी जमेना. ऑस्ट्रेलियात मात्र मिक्सोमा रोगजंतूंनी डासांच्या मदतीने चोख काम केले. न्यूझीलंडमधे फार मोठ्या प्रमाणावर विषारी द्रव्ये पसरावी लागली.

 भारतामधे पंचवीस वर्षांपूर्वी, आयात केलेल्या अमेरिकन गव्हाबरोबर एक

रंगेल तोच तगेल / ७