पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खगोलशास्त्रज्ञ प्रत्येक तारा, ग्रह, धूमकेतू हा ईश्वराच्या इच्छेनुसार चालतो असं म्हणतील का ? की त्यांच्या गणिती नियमानुसार चालतो असे सांगतील ? मग त्यात ईश्वराचा अधिक्षेप कसा होत नाही ?
 ही भूमिका आडवळणाने त्याच्या पुस्तकात आली होतीच. त्यामुळे परंपरावाद्यांनी वर्तमानपत्रांतून, सभांमधून डार्विनंवर टीकेची झोड उठवली. टॉमस हक्सले हा डार्विनचा तरुण शास्त्रज्ञमित्र डार्विनच्या बाजूने जोरदार प्रतिहल्ला चढवत असे. इतका प्रखर की, हक्सलेला डार्विनचा बुलडॉग असे टोपणनाव पडले. अशीच एक प्रसिद्ध सभा ३० जून १८६० रोजी ऑक्सफर्डमध्ये झाली. सॅम्युअल विल्बरफोर्स या ऑक्सफर्डच्या बिशपने उत्क्रांतिवादावर कडाडून हल्ला चढवला. भाषणाच्या. शेवटी बिशपसाहेबांनी मोठ्या उपहासाने विचारले की, मिस्टर हक्सले, तुमचा पूर्वज माकड होता असे तुम्ही मानता ते तुमच्या आजीकडून की आजोबाकडून ? हक्सलेने उत्तर दिले, की वैज्ञानिक चर्चेमध्ये उथळपणा आणून आपल्या बुद्धिमत्तेचा सत्यशोधना- ऐवजी चिखलफेकीसाठी उपयोग करणाऱ्या बिशपपेक्षा माकड हा पूर्वज परवडला. उपस्थित विद्यार्थ्यांनी हक्सलेचे टाळ्यांच्या गजराने कौतुक केले आणि बिशप- मजकुरांना अवमानित होऊन परत जावे लागले.
 असा हा डार्विनचा सिद्धांत नेमका होता तरी काय ? वरच्या वर्णनावरून काही भाग उघड दिसतो. जीवसृष्टीची घडण निसर्गनियमांनी, ईश्वराच्या हस्तक्षेपाविना होते. माणूस आणि माकडाचा वंश एकच आहे. पण हे तर आपल्याला शाळेतच पुस्तकातून कळते. त्यापुढे जाऊन कदाचित जंगलचा कायदा - बळी तो कान पिळी असेही कानावरून गेलेले असते किंवा सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. ( मला या वाक्प्रचाराचे ' रगेल तोच तगेल' असे रूपांतर करायला आवडेल.) पण हे डार्विनचे शब्द नाहीत. ते आहेत हर्बर्ट स्पेन्सरचे लोकमान्य टिळकांवर मिल्ल आणि स्पेन्सरच्या विचारांचा प्रभाव पडला होता असे आपण शाळेत इतिहासात वाचतो. हे विचार नेमके काय होते ते मात्र कोणी नेमकेपणाने सांगत नाही. स्पेन्सरने उत्क्रांतिवादावर केलेले भाष्य आपण पुढे पाहणार आहोत. त्याआधी डार्विनच्याच शब्दांत उत्क्रांति- वादाची मांडणी पाहू या.

 निसर्गात सर्वत्र युद्ध चालू असते. प्रत्येक प्राण्याचे दुसन्या प्राण्याशी आणि परि-

रगेल सोच तगेल / ५