पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गंमत म्हणजे श्रोत्यांपैकी कोणालाही आपण काही युगप्रवर्तक विचार ऐकत आहोत हे लक्षात आले नाही. बैठकीत पुढे काहीही प्रश्नोत्तरे वा चर्चा झाली नाही. सोसा- यटीच्या अध्यक्षांनी तर त्या सालच्या अहवालात म्हटले की, ' अहवालवर्षांत कोणताही क्रांतिकारक शोध लागला नाही. नाहीतरी बेक, न्यूटन यांच्यासारखे लोकोत्तर' संशोधक क्वचितच, ईश्वरेच्छा असेल तेव्हाच अवतरतात. ' ( दैवगती म्हणजे डार्विनच्या मृत्यूनंतर त्याचे वेस्टमिन्स्टर अॅबी इथल्या कबरस्थानात इतमामाने न्यूटनच्या कबरीशेजारी दफन केले गेले.) पुढल्या वर्षी ' ओरिजिन ऑफ स्पिसीज बाय मीन्स ऑफ नॅचरल सिलेक्शन ऑर द प्रिझर्वेशन ऑफ द फेवर्ड रेसेस इन द स्ट्रगल फॉर लाइफ' या मालगाडीसारख्या शीर्षकाचे सहाशे पानी पुस्तक डार्विनने प्रसिद्ध केले, तेही मित्रांच्या आग्रहामुळेच. एरवी त्या पुस्तकात डार्विनच्या मते बऱ्याच गोष्टी घालायला हव्या होत्या व त्याला वेळ लागला असता. तो भाग मग पुढे स्वतंत्रपणे प्रसिद्ध झाला. 'डिसेंट ऑफ मॅन' हे पुस्तक त्यांपैकीच. 'ओरिजिन ऑफ स्पिसीज... ' च्या प्रकाशनानंतर मात्र इंग्लंडमध्ये मोठेच वादळ निर्माण झाले. खरे तर माणसाबद्दल या पुस्तकाच्या शेवटच्या काही पानात थोडासा मजकूर आहे. पण तरीही अनेक शास्त्रज्ञ, धर्मगुरू आणि सामान्यजन डार्विनवर फार रागावले. आपल्याला हा माकडाचे वंशज म्हणतो हे लोकांना रुचेना. सृष्टी परमेश्वरेच्छेप्रमाणे चालते है नाकारतो हे बघवेना. डार्विनला ही कल्पना होतीच. म्हणून आधी त्याने या लिखाणाच्या मरणोत्तर प्रकाशनाची व्यवस्था करायचे ठरवले होते. पण वॉलीसमुळे ती योजना फिसकटली.
अर्थात विरोधाच्या वादळाला बुजणे निराळे आणि आपली मते सोडणे निराळे. डार्विन आपल्या मतांना ठामपणे चिकटून होता. तो म्हणे, 'परमेश्वर जीवसृष्टीचं क्षणाक्षणाचं नियोजन करतो, आपल्या कृपाप्रसादाचा सर्व प्राणिमात्रांना लाभ करून देतो, असं मला खरोखरच वाटत नाही. मला जगात सर्वत्र दुःख आणि क्रौर्य दिसतं. मांजरानं उंदराच्या जिवाशी खेळ करावा ही त्या दयाळू सर्वशक्तिमान परमेश्वराचीच इच्छा असं मी कसं मानू ? माझ्या मते गोष्टी घडतात त्या निसर्गनियमानं. '

 सर जॉन हर्शल हा त्या काळचा प्रख्यात खगोल शास्त्रज्ञ. त्याच्या मते सृष्टीच्या रचनेचे दैवी नियमच माणसाने सांगितले पाहिजेत. यावर डार्विनचे उत्तर असे की,

४ / नराचा नारायण