पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

डार्विनने तोंड भरून आश्वासन दिले, की परतल्यावर मी धर्मगुरू होईन.
 पाच वर्षे डार्विन भटकत राहिला. त्याने नाना तऱ्हेची निरीक्षणे केली. जमीन पाहिली, डोंगर पाहिले, प्राणी, पक्षी, वनस्पती, आदिवासी, नागरी समाज, एक ना दोन. निरीक्षणे तपशीलवार लिहून ठेवली. दगडांचे, प्राण्यांचे, वनस्पतींचे नमुने पेटारे भरभरून इंग्लंडला पाठवले, डार्विनची पत्रे त्याच्या प्राध्यापकांनी प्रसिद्ध केली. त्यातून, पृथ्विप्रदक्षिणा करून घरी येण्याच्या आधीच डार्विनला लोकमान्यता मिळाली. इतकी, की डार्विनच्या वडिलांनी त्याला सांगितले, बाबारे तुझ्या भविष्याबद्दलची माझी काळजी संपली. नाहीतरी तुला इस्टेट भरपूर मिळणारच आहे. विज्ञानाच्या संशोधनात जरी तू आयुष्य घालवलेस, तरी मला पूर्ण समाधान आहे. पुढली सुमारे दहा वर्षे डार्विनने, सफरीहून आणलेल्या सामानाचा अभ्यास करून त्यावर लिखाण प्रसिद्ध करण्यात घालवली. अजूनही ब्रिटिश म्यूझियममध्ये डार्विनने गोळा केलेले काही नमुने अभ्यासकांची वाट पाहत पडून आहेत. हे लिखाण उत्क्रांतिवादावरचे नसून भूगर्भशास्त्रावरचे होते. उत्क्रांतीवरचे आपले विचार तो गुपचूप डायरीत लिहून ठेवत असे. सुरुवातीला त्याने आपल्या बायकोला ते समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण ती बिचारी धार्मिक वृत्तीची होती. ती त्याला म्हणत असे की, विज्ञानाच्या नावाखाली तुझा चिकित्सकपणा फार वाढलाय आणि माणसाच्या बुद्धीला अगम्य गोष्टीवरही तू तेच तर्कट चालवतोस. मग बुजरा डार्विन तिलाही काही सांगेनासा झाला. पुढे आपल्या वेचक आणि विश्वासातल्या वैज्ञानिक मित्रांना तो आपले विचार सांगू लागला. आपली बाजू शंभर टक्के पक्की करून एकदम पुस्तकरूपाने प्रसिद्ध करावी अशी त्याची योजना होती. पण घडले वेगळेच.

 डार्विनच्या परिचयातल्या आल्फ्रेड रसेल वॉलीस या अभ्यासकाने इंडोनेशियातून एक पत्र लिहून उत्क्रांतिवादावरचा आपला निबंध डार्विनकडे पाठवला आणि तो प्रसिद्धीला धाडण्याची विनंती केली. वॉलीसने जणू डार्विनच्या त्या गुप्तं चोपडी- तूनच मजकूर उचलला असावा असे वाटण्याइतकी दोघांची विचारधारा एक होती. दोघांनाही योग्य श्रेय मिळावे, म्हणून डार्विनच्या मित्रांनी वॉलीसचा निबंध आणि डार्विनचा एक अप्रकाशित लेख १ जुलै १८५८ रोजी लिनिअन सोसायटीपुढे वाचून दाखवले, डार्विन धास्ती आणि संकोचापोटी या बैठकीला गेलाच नव्हता.

रगेल तोच तगेल / ३