पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उपटसुंभ लुटून नेणार नाही असा भरोसा हवा.हिंदू समाजाच्या रचनेमधे या अटी बऱ्याच अंशी पूर्ण झालेल्या दिसतात.(जातिव्यवस्थेच्या स्थैर्याचे विश्लेषण करताना हा मुद्दासुद्धा लक्षात घ्यायला हवा.तसेच एक नवी समाजरचना घडवण्याचा प्रयत्न करताना ती संयमी वृत्तीला पोषक राहील याची काळजी घ्यायला हवी.)या रचनेमधे पोटजातीचा व्यवसाय पिढ्यानपिढ्यासाठी ठरलेला असतो.पोटजातीचे प्रमुख एकत्र येऊन काही नियम करू शकतात आणि लादू शकतात.अचानकपणे दुसरी एखादी पोटजात आपल्या व्यवसायात घुसणार नाही असा भरोसा लोकांना वाटतो.त्यामुळे आपण ज्या साधनावर अवलंबून आहोत ते संपू नये म्हणून तऱ्हेतऱ्हेच्या व्यबस्था झालेल्या दिसतात.
 फासेपारधी गाभण हरिणीला पकडत नाही.तिची पाडसे मोठी होतील तर आपल्यालाच जास्त मांस मिळेल असा सोपा हिशोब इथे असतो.भंडारा जिल्ह्यातले धीवर कोळी,माशांच्या विणीच्या हंगामात अंडी घालायला जाणाव्या माशांना पकडत नाहीत.यमुनेच्या काठावर एका खेड्यात पद्धत आहे की विष टाकून मासे मारणे सोपे असले तरी तो मार्ग वर्षातून एकदाच गावजेवणासाठी वापरायचा.एरवी गळ टाकून जे मासे मिळतील त्यांच्यावर समाधान मानायचे.विष टाकणाराला सजा होते.वड,पिंपळ,उंबर ही झाडे देवाची म्हणून राखली गेली आहेत.माकडे,मोर हे जीव देवाचे म्हणून त्यांच्या शिकारीवर सामाजिक बंधन आहे.देवळाच्या भोवतीचे ठराविक क्षेत्र माणसे,गुरे,बकऱ्या सर्वांपासून सुरक्षित ठेवण्याचा ठिकठिकाणी प्रघात आहे.या चिमुकल्या वन-उपवनांना देवराया असे म्हणतात.अनेक दुर्मिळ वनस्पती देव- रायांमधे सुरक्षित राहिल्या आहेत.

 या उलट निसर्गसंपत्ती मुबलक असेल तर तिचा जपून वापर करणारा मागे पडून इतर पुढे जातील. हव्या त्या गोष्टी ओरबाडून घेऊन पुढे चालू लागायचे या पद्ध ‘ काऊबॉय इकॉनॉमी' असा शब्दप्रयोग गमतीने केला जातो.उलट 'ॲस्ट्रोनॉट इकॉनॉमी' म्हणजे प्रत्येक गोष्ट जपून, साफ करून पुन्हा पुन्हा वापरायची.काहीही उधळायचे नाही.आपल्याकडे काही भागात कुमरी झुम,पेंदा,शिफ्टिंग कल्टिव्हेशन वगैरे नावाने प्रचलित असलेला शेती प्रकार आहे.यात जंगलतोड करून झाडोरा जाळून टाकून शेती करतात आणि जमिनीचा कस घटला की सोडून देतात.लोक-

१५८ / नराचा नारायण