पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लोकांकडून पिमा जमातीला गहू मिळाला.पूर्वी मक्याचे पीक फक्त उन्हाळ्यात घेता येत असे.आता हिवाळ्यात गहू करता येऊ लागला.शेती जवळजवळ बारमाही झाली.शिकारीचे महत्त्व आणखी घटले.गावे आणखी मोठी झाली. अनेक गावांनी एकत्र येऊन आणखी मोठे कालवे खणले.आता सबंध जमातीच्या प्रमुखाचे महत्त्व वाढले,अपाची जमात यांच्यावर हल्ले करून लुटालूट करत असे.आता पिमा जमातीने मोठाल्या तटबंधा बांधल्या.अचानक हल्ल्याला वेगवेगळ्या गावांनी मिळून कसे तोंड द्यायचे,याच्या योजना तयार झाल्या.शेतीतून अन्न पुरून उरायला लागले. त्याचा व्यापार सुरू झाला.पापागो जमातीच्या लोकांना पिमा इंडियन्सनी मजुरीवर कामालासुद्धा ठेवले.पापागोंच्या प्रदेशात गव्हाची शेती होऊ शकली नाही.त्यांच्या संघटनेतही प्रगती झाली नाही.
 विसाव्या शतकाच्या सुरुवातीला आणखी एक नवीन पीक आले.कापूस.पण नवीन यंत्रे,खते,कर्ज हीसुद्धा आली.हा आधुनिकतेचा भडिमार पिमा जमातीला-सुद्धा पेलवला नाही.परिस्थितीतील बदल फार झपाट्याने झाला. समाजरचनेत बदल करायला पिमांना फुरसत मिळाली नाही.शेवटी पिमा आणि पापागो दोन्ही जमाती स्पॅनिश जमीनदारांकडे मजुरी करू लागल्या.
 आजूबाजूची परिस्थिती बदलते तेव्हा गुणबदलाच्या प्रक्रियेतून प्राणी, वनस्पती बदलतात आणि पुन्हा नव्या परिस्थितीला अनुरूप होतात.गुणबदलाचा वेग कशाने ठरतो ? हा आता समाज - मानसशास्त्राचा प्रांत आला.जाहिराती,प्रचार,लोकशिक्षण,लालूच यांच्यामुळे हा वेग वाढवता येतो काय ? या प्रश्नांचा वैज्ञानिक अभ्यासही अजून प्राथमिक अवस्थेत आहे. पण परिस्थितीतील बदलाचा वेग वाढतो तेव्हा अडचणीत पडलेले गट जास्त प्रमाणात आढळू लागतात असे दिसते.

 पश्चिम घाटाच्या माथ्यावर भरपूर पाऊस पडतो.परंतु उन्हाळ्यात पाण्याचा ठण-ठणाट असतो.पिण्याच्या पाण्यासाठी डोळयातून पाणी काढावे लागते.पण पाण्याची साठवण करण्याची पद्धत नाही.उलट राजस्थानसारख्या कायम दुष्काळी भूभागात लोक घरोघर,गावोगाव पावसाचे पाणी नेटकेपणाने साठवतात.कदाचित घाटमाथ्या-वरची पाणीटंचाई हा अलीकडचा,लोकसंख्यावाढीमुळे आणि वनांच्या महासामुळे निर्माण झालेला प्रश्न असावा.येथील रहिवाशांच्या रीतिबदलाचा वेग येथे कमी

१५६ / नराचा नारायण