पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असा प्रकार ब्राझीलमधे अॅमेझॉन नदीच्या खोऱ्यात रहाणाऱ्या आदिवासींमधे एका अभ्यासकाला दिसला.या भागात मानवाचा प्रवेश १०,००० वर्षांपूर्वी झाला असावा.( अमेरिका खंडावर मानव ४०,००० वर्षांपूर्वी आला असा एक अंदाज आहे. )येथील आदिवासी शिकार,मासेमारी,कंदमुळे,फळे गोळा करणे या पद्धतीने राहत असत.सुमारे ४००० वर्षांपूर्वी त्यांनी थोड्या प्रमाणात शेती आणि फळबाग इत करायला सुरुवात केली.पण ते पूर्णत्वाने शेतकरी कधीच झाले नाहीत.असे का व्हावे ? शेतीत कमी कष्ट आहेत ना?
 माणसाला अन्नोत्पादनाचे जर विविध पर्याय उपलब्ध असतील तर ज्या पर्यायांमधे कमी कष्टात जास्त उत्पन्न मिळते तो स्वीकारला पाहिजे ना?
 या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न झाला तेव्हा काही अनपेक्षित गोष्टी उजेडात आल्या.दिवसाला माणशी २७५० कॅलरी ऊर्जा देणारे अन्न लागते या हिशोबाने वार्षिक १० लाख कॅलरींची गरज आहे.( १ ग्रॅम तांदुळापासून ४ कॅलरी मिळतात,तर १ ग्रॅम तेल ९ कॅलरी उष्णता देते. म्हणून तर थंडीत तीळ खाण्याची आपली पद्धत आहे. ) तपशीलवार हिशोबातून असे दिसून आले की,एवढ्या कॅलरी मिळवण्या-साठी माणसाला शिकारीत सुमारे ८०० तास घालवावे लागतात,तर शेतीत ६००.शास्त्रज्ञांच्या मते हा फरक दैनंदिन व्यवहारात सहज लक्षात येण्याइतका ढोबळ नाही. जे आदिवासी अॅमेझॉन नदीच्या काठाने राहतात,त्यांना वर्षभर मासळीचा हुकमी पुरवठा उपलब्ध असतो. म्हणून ते स्थायिक झाले. खेड्यात राहू लागले आणि स्वाभाविकपणे शेतीकडे त्यांचा कल वाढला. पण जे आतल्या भागात, लहान सहान ओढ्या-ओहोळांच्या आश्रयाने राहिले,त्यांना एका जागी राहून पुरेसे अन्न मिळण्याचा भरवसा नव्हता.त्यामुळे ते शिकारीवर विसंबून राहिले.याचा अर्थ भटकेपणा आला.तीन-चार कुटुंबे जरी एकत्रित राहिली,तरी वर्षा दोन वर्षांत एका ठिकाणची शिकार संपू लागते.वस्ती बदलावी लागते.एकूण अन्नापैकी शेतीतून मिळणारा भाग आणि त्या जमातीचा भटकेपणा यांचा अगदी गणिती संबंध असतो असे दिसून आले.

 माणूस जितका स्थायी होतो, त्याचा अन्नपुरवठा जितका भरवशाचा होतो तितकी त्याची समाजरचना अधिकाधिक सातत्याची आणि गुंतागुंतीची होते.उलट सतत

१५४ / नराचा नारायण