पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अर्थ गुरे फारतर ८-१० मैल त्रिज्येच्या परिसरात फिरणार.एवढ्या जागेत किती गुरांना पोटभर चारा मिळू शकेल,ती गुरे दूध किती देतील,त्या दुधाचे पैसे किती येतील,त्या पैशाचे धान्य किती येईल,त्या धान्यावर किती माणसांची गुजरण होईल.असा ढोबळ हिशोब केला तर आकडा चार-पाच कुटुंबांपर्यंत येतो.याचा अर्थ निसर्ग-नियमानुसार वागायचे झाल्यास गवळ्यांच्या वस्त्या चार-पाच घरांच्या आणि एक-मेकांपासून आठ-दहा मैल अंतरावर असल्या पाहिजेत.प्रत्यक्ष स्थिती थोड्याफार फरकाने अशीच आहे.याचा अर्थ असा नव्हे की,गवळी धनगरांना एकमेकांपासून आठ-दहा मैलांवर रहायला लावणारी एखादी जीन त्यांच्या शरीरात आहे.अशा जीन्स अस्तित्वात असणे फारच दुरापास्त वाटते.पण माणसाच्या सांस्कृतिक घडणीकरिता जीन्समधे गुणबदल होण्याची गरज नाही.माणूस बदलत्या निसर्गाचा अंदाज घेऊ शकतो.बदलत्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी नवे नवे मार्ग शोधू शकतो.नवी कृती करू शकतो.
 गवळ्यांच्या वस्त्यांबद्दल जसा अंदाज बांधला तसा शिकारीवर अवलंबून असणाऱ्या समूहांच्या वस्त्यांबद्दलही बांधता येतो.शिकार करणारा आदिमानव नात्यातल्या काही कुटुंबांची टोळी करून राहायचा.पुरुष गटाने शिकारीला जायचे.किती लांब जात असतील ? साधारण पहाटे निघून संध्याकाळी परत येण्याजोग्या अंतरापर्यंत म्हणजे १५ ते २० किलोमीटर त्रिज्येच्या वर्तुळात.म्हणजे सुमारे ७०० ते १२०० चौरस.किलोमीटर क्षेत्र.एका माणसाला पुरेशी शिकार मिळवण्याकरता १० ते २० चौरस किलोमीटर क्षेत्र लागते असे धरल्यास,एका टोळीत ३५ ते १२० माणसे म्हणजे ७ ते २४ पुरुष होतील.यांच्या शिकार क्षेत्रात दुसरे येतील तर संघर्ष होईल.
 पुरुष लग्नं कोणाशी करतील? त्याच एकत्र कुटुंबात आपसात लग्ने होत राहिली तर रिसेसिव्ह जीन्सचे परिणाम या टोळीला भोगावे लागतील.म्हणजे दुसऱ्या जवळच्या टोळीशी लग्नसंबंध ठेवणे फायद्याचे ठरेल.अशा आपसात लग्नसंबंध ठेवणाऱ्या टोळ्यांचा समूह म्हणजे जमात.

 शेतीची उत्पादनक्षमता शिकारीपेक्षा खूपच जास्त.त्यामुळे शेतीवर आधारित जमाती संख्येने मोठ्या असणार.शेती किंवा फळबागायत करण्याचा पर्याय उपलब्ध असून तो स्वीकारला नाही तर काय निष्कर्ष काढता येईल? काहीतरी गोंधळ आहे.

नराचा नारायण / १५३