पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 नंदीवाले,दरवेशी,गारुडी,माकडवाले हे चारी गट प्राण्यांना शिकवून,करमणूक करून पोट भरणारे पण ते बैल, अस्वल, साप,माकड अशा वेगवेगळ्या प्राण्यांवर लक्ष केंद्रित करतात.यातूनही स्पर्धा टळते.
 कैकाडी आणि माकडवाले दोन्ही जमाती टोपल्या विणतात.पण कैकाडी केवळ बांबू वापरतात तर माकडवाले केवळ नारळ, शिंदीच्या झावळ्या वापरतात.
 भिक्षुकांमधेही असे वाटप असू शकते.एकाच गावातले भिक्षुक यजमान घरे वाटून घेतात.किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या समारंभांना उपाध्यायगिरी वेगवेगळे लोक करू शकतात.मर्तिकाचे काम करणे हा असाच एक कोनाडा. पुणे शहरामघे हे काम माझ्या ऐकीव माहितीप्रमाणे फक्त एक कुटुंब करते.तेव्हा इथे ' स्कोप' आहे असे म्हटले पाहिजे.सामान्यपणे निसर्गात अशी पोकळी दीर्घकाळ शिल्लक राहत नाही.पण सध्या बऱ्याच जणांच्या प्रतिष्ठेच्या कल्पनांमधे हे काम बसत नाही.
 'एकाच भूभागात राहायचे असेल,तर वेगवेगळी नैसर्गिक साधनसंपत्ती वापरा आणि एकाच साधनाचा वापर करायचा असेल तर वेगवेगळ्या ठिकाणी वस्ती करा हा झगडा टाळण्याचा मार्ग आहे.
 काही वेळा झगडा टळत नाही.मग विजेता गट निसर्गातील जास्त उत्पादनक्षम भागावर सत्ता गाजवतो. पश्चिम महाराष्ट्रांत आज सह्याद्रीच्या माथ्यावर,गुराढोरांना चारून त्यांचे दूध विकून गुजराण करणारे गवळी धनगर दिसतात.हे पूर्वी खोऱ्यां मधे सुपीक जमिनीवर वास्तव्य करून होते.पुढे वाढत्या लोकसंख्येमुळे वा अन्य कारणामुळे शेती करणाऱ्या आणि संख्येने मोठ्या असलेल्या मराठा-कुणबी जाती या खोऱ्यांकडे वळल्या.
 पुणे जिल्ह्यातल्या मुळशी भागातले गवळी धनगर दंतकथा सांगतात की,फार पूर्वी इथे धनगरांची देवी वाघजाई आणि कुणब्यांची देवी शिर्काई यांच्यात लढाई झाली आणि वाघजाई आपले देऊळ हलवून डोंगरमाथ्यावर गेली.या गोष्टीतील संकेत उघड आहे.आजही माथ्यावर राहणाऱ्या धनगरांना खोन्यातल्या कुणबी वस्त्यांचा धाक वाटतो.

 गवळी धनगरांचे जीवन गुरांचे पोट भरण्यावर अवलंबून आहे.दिवसभर डोंगर-माथ्यावर चारून गुरांना रात्री सुरक्षित उबदार गोठ्यात बांधून ठेवायला हवे.याचा

१५२ / नराचा नारायण