पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हणून काय झाले ? दुसरा काही पर्याय निघेल.निसर्गातही उत्क्रांतीमधे एकाचे अडचणीतून अनेक प्रकारे मार्ग काढला जातो.शत्रूपासून बचाव म्हणून काही प्राणी लपतात तर काहींच्या अंगावर काटे असतात.काहींच्या अंगात दुर्गंधीयुक्त किंवा विषारी द्रव्ये असतात,तसेच समाजरचनेत असू शकेल.
 एकाच जागी दोन वेगळ्या जातीचे प्राणी असतील तर तर्क करावा की त्यांचे लक्ष वेगवेगळ्या गोष्टींवर आहे.एरवी झुंज झाली असती.एकाच झाडावरचे काही पक्षी पानाफुलांच्या आसपास घुटमळतात.तिथले किडे,तिथली फळे खातात.सुतारपक्ष्या-सारखे पक्षी बुंधा आणि साल यांच्या आसपास असतात आणि सालीच्या आतले किडे खातात.वेगवेगळ्या जातीचे ससाणे एकाच जागी जमिनीवरच्या छोट्या प्राण्यांची शिकार करतात.पण त्यांनी जणू काही भक्ष्यप्राणी वाटूनच घेतलेले असतात.एक जात अगदी लहान म्हणजे सरडा, चिचुंद्रीएवढ्या प्राण्यांची शिकार करते.तर दुसरी उंदराएवढ्या प्राण्यांची आणि तिसरी घुशीएवढ्या शास्त्रज्ञ या वाटपाला ' निच' किंवा कोनाडा असा शब्द वापरतात.एकाच भिंतीवर रहा पण आपापल्या कोनाड्यात रहा म्हणजे संघर्ष टळेल.

 पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळी भागात राहणाज्या नंदीवाले,वैदू आणि फासेपारधी या तीन जमाती बऱ्याच अंशी शिकारीवर जगतात.या जमाती वेगवेगळी तंत्रे वापरतात,वेगवेगळ्या प्राण्यांची शिकार करतात आणि त्यामुळे त्यांचा आपसात संघर्ष होत नाही.नंदीवाले कुत्री वापरतात.एकेका कुटुंबात पांच पाच कुत्री असतात.ही कुत्री माग काढतात, पाठलाग करतात,प्राणी मारतातसुद्धा.कुत्र्यांच्या मदतीने नंदीवाले तरस,रानमांजर,डुक्कर,ससा,साळिंदर यांची शिकार करतात.वैदूसुद्धा कुत्रा पाळतात.पण एखादाच.वैदूंचे भक्ष्य म्हणजे मुंगूस,मांजर,खार वगैरे.पूर्वी ते गोड्या पाण्यात खेकडे, कासव, सुसरीसुद्धा मारायचे.फासेपारध्यांनी कधी कुत्रे वापरले नाहीत.शिकवलेल्या गायीच्या मागून जाऊन हळूच हरणांना फाशात पकडायचे हे त्यांचे तंत्र,शिवाय मोर,तितर,लाव्हे वगैरे पाखरेसुद्धा ते घरतात.या तीन जातींची तंत्रे एकमेक शिकू शकणार नाहीत असे मुळीच नव्हे.फासेपारधी जे प्राणी मारतात ते खायला नंदीवाले नाखूष असतील असेही नाही.पण तरी वाटप झाले आहे एवढे खरे.

नराचा नारायण / १५१