पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असते.एस्किमो ध्रुवप्रदेशात राहतात.इथे झाडोरा नाहीच.बर्फाच्या थराखालच्या पाण्यातले मासे मारून राहावे लागते.हे मासे कच्चेच खाल्ले जातात.कारण भाज-णार कशावर ? थोडीबहुत चरबी मिळाली तर ती दिवे पेटवण्याकरता उपयोगी पडते.या प्रदेशात माणसे फारच विखरून राहतात.त्यामुळे जमातीचे प्रमुख, त्यांची पंचायत,नियम,निवाडे वगैरे प्रकार नाहीतच.जो तो बराचसा आपापले आयुष्य जगतो.
 आपल्याकडे वैदू,नंदीवाले या जमाती व्यवसायापोटी भटक्या झाल्या आहेत.हे एकाच जागी राहिले तर जडीबुटी विकत घेणार कोण आणि रोजरोज नंदीबैलाला मान हालवताना बघणार कोण? म्हणून त्यांना गावोगावी गेलेच पाहिजे.पावसाळ्यात शेतीची कामे सुरू होतात.गिन्हाईक कमी होते.प्रवास जिकीरीचा होतो.म्हणून जमाती ठरल्या गावी मुक्कामांना जातात.तेवढ्या काळात जातपंचायत,जातप्रमुख यांच्या नियमाप्रमाणे वागावे लागते.ही माणसे वेगळ्या व्यवसायात शिरली विखरून गावोगाव स्थायिक झाली तर जातपंचायतीच्या पकडीचे स्वरूप बदलेल.
 शक्यतो झगडा टाळणे हा निसर्गनियम आहे. झगडयात पराभूत प्राण्यालाच नव्हे जिंकणाऱ्यालाही त्रास होतो. जखमा होतात.शक्ती वाया जाते.दुसरा कोणी टपून बसलेला असतो तो या संधीचा फायदा घेतो.म्हणून बरेचदा निव्वळ शक्तिप्रदर्शन करून निर्णय लावण्याचा प्रयत्न होतो किंवा उपलब्ध साधनांचे वाटप होते.प्राणी आपापला मुलूख आखून घेतात.घुसखोरी झाली तरच मारामारी होते.कुत्रे परक्या माणसावर भुंकतात पण त्यांच्या मुलखाच्या पलीकडे तो माणूस निघून गेला की आपल्या कामाला लागतात.
 नंदीवाल्यांमधे कोण कोणत्या मार्गाने कोणत्या कोणत्या भागात खेड्यांमधे जाऊन पैसे मिळवणार याचा एकत्रपणे निर्णय केलेला असतो.हे नियम मोडून दुसऱ्याच्या मुलखात घुसखोरी करणाराला जातपंचायत शिक्षा म्हणून दंड करते.पंचायतीला न मानणाराला जातीतून बहिष्कृत केले जाऊ शकते.मग मुलाबाळांची लग्ने होत नाहीत.देवाधर्माला, समारंभाला कोणी येत नाहीत.आणि दुसऱ्या जातीमधे तर प्रवेश नसतो.मग माणूस नाक मुठीत धरून पंचांसमोर गुडघे टेकतो.

 जातीची चौकट नसलेल्या समाजात कदाचित अशी व्यवस्था टिकणार नाही.

१५० / नराचा नारायण