पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 उलट आहारासारखी बाब,जेथे विविध पर्याय शक्य असतात,दीर्घकालीन अनु-भवाची शिदोरी जवळ असते तेथे सामाजिक रीती बऱ्याच अंशी उपयुक्ततेला धरून असल्याचे दिसते.
 ऋतुकालोद्भव पदार्थातून निवड करून आपण आहार ठरवतो.तो बराचसा रूढी आणि परंपरांनी ठरतो.भारतीय शाकाहार,विशेषतः गरिबांचा आहार हा पोषणयोग्य नाही असा ओरडा अनेक वर्षे पाश्चात्य तज्ज्ञांनी केला.त्यात प्रथिनांची कमतरता आहे.त्यामुळे इथल्या मुलांची वाढ नीट होणार नाही असे त्यांनी सांगितले.प्रसिद्ध संख्याशास्त्रज्ञ डॉ. पां. वा. सुखात्मे यांनी प्रतिपादन केले की, भारतीयांच्या परंपरागत आहारात पिष्टपदार्थ ( तांदूळ, ज्वारी, गहू) आणि डाळी यांचे योग्य प्रमाण आहे.डाळींमधून पुरेशी प्रथिने मिळतात. त्यात काहीही कमतरता नाही.गरज आहे ती उत्पन्नाचा स्तर वाढवण्याची.मिळालेल्या पैशातून माणसे योग्य प्रमाणात वेगवेगळे पदार्थ सेवन करतील.
 सी व्हिटॅमिनच्या अभावाने रोग होतात हा शोध अलीकडचा, पण भातावर लिंबू पिळावे ही रूढी जुनीच. खूप पॉलिश करून कोंडा पूर्ण काढलेल्या तांदुळांवर ठेवलेले कबूतर मरते हा शोध नवा, पण हातसडीचे तांदूळ खाण्याची पद्धत आणि कोंडयाचेही मांडे केले पाहिजेत हा आग्रह जुनाचं अर्थात रूढी परिपूर्ण आहेत किंवा त्यात कोणतेच बदल नको असा अट्टाहास करणे चूक ठरेल.उदाहरणार्थ भारतात गरिबांच्या घरात आंधळेपणा येणाऱ्या बालकांची संख्या बरीच आहे.हे 'ए' व्हिटॅमिनच्या अभावामुळे घडते.लाल भोपळा शिजवून मऊ करून भरवला तर काही महिन्याचे मूलसुद्धा तो खाऊ शकेल. यातून मिळणारे 'ए' व्हिटॅमिन, बाळाच्या डोळ्याची राखण करायला पुरेसे होईल. पण ही रूढी नाही. हेच बाळ समृद्ध घरात असेल तर त्याच्या नेहमीच्या आहारातून त्याला पुरेसे ए व्हिटॅमिन मिळेल.

 ए व्हिटॅमिनचा आहारात अतिरेक झाला तरी त्याचे शरीरावर भयानक दुष्परिणाम होऊन मृत्यूसुद्धा येऊ शकतो. असा अतिरेक होण्याचा स्वाभाविक मार्ग म्हणजे ए व्हिटॅमिन प्राणिशरीरात जेथे साठते तो अवयव अर्थात काळीज किंवा लिव्हर, यकृत मोठ्या प्रमाणावर खाल्ला जाणे. इतर मांसांच्या तुलनेने शरीराचा हा भाग फार मऊ,लुसलुशीत आणि खाण्यास सुलभ असतो म्हणून अननुभवी माणसाने त्याचा पुक्खा

१४८ / नराचा नारायण