पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 आदिम समाजामधे जादूटोणा आणि भगतगिरी यांना फार महत्त्व असते.एका अमेरिकन इंडियन जमातीत कोणत्या दिशेला शिकारीला जावे, हे ठरवण्यासाठी भगताला विचारतात.तो एक हाड ( ज्या जातीच्या प्राण्याची शिकार करावयाची त्याचे ) धगीमधे धरतो.हाडावर काळ्या रेघांचे चित्रविचित्र आकार उमटतात.ते पाहून आणि आपली 'दिव्य' शक्ती वापरून भगत शिकारीला योग्य दिशा दाखवतो.ही रूढी का टिकली असेल ? काही अभ्यासकांच्या मते भक्ष्य प्राणी हे अनियमितपणे,यादृच्छिकपणे किंवा रँडमली पसरलेले असतात.भगताची दिशानिवडही अशीच असते.तर्कशास्त्र वापरून त्यात सुधारणा करणे अवघड असते.अपरिचित दिशा,अवघड बाजू टाळणे एवढे काम मात्र भगताच्या हातून होते.
 यातून आणखी एक प्रमेय सुचते. जेथे परिस्थितीच अनिश्चित, रँडम असते तेथे विचार करून निर्णय घेणे, फासे टाकून निर्णय घेणे आणि जादूटोण्यावर विसंबणे तिन्हीचा अर्थ एकच असतो.म्हणून जादूटोणा टिकतो.म्हणून शिकारीवर अवलंबून असलेल्या मानवसमूहात जादूटोणा जास्त दिसतो.
 भारतीय शेतकऱ्याच्या जीवनात पाऊस-पाणी ही अशीचं अनियंत्रित, अनिश्चित बाब आहे.तिच्यापुरता शेतकरी अंधश्रद्धाळू असतो.पिकाची निवड, मशागत या गोष्टी दीर्घ अनुभवाने निश्चित होतात.तेथे जादूटोण्याला मुळीच वाव नाही.परंपरेने सिद्ध झालेल्या रूढींना शेतकरी घट्ट चिकटून असतो.म्हणून पारंपरिक शेतकरी समाजात रूढीचे प्राबल्य असते.
 औद्योगिक समाजात भरभराटीची किल्ली असते विज्ञान आणि तंत्रज्ञान,जॉन केनेथ गालब्रेथ यांनी 'द न्यू इंडस्ट्रिअल स्टेट' या ग्रंथात म्हटल्याप्रमाणे पाश्चात्य देशातील मोठ्या कंपन्यांच्या नफ्याची वाढ ही नवीन शोष आणि तंत्रज्ञानातील प्रगती यावर फारच अवलंबून असते.म्हणून जादूटोणा जातो,रूढींचे महत्त्व घटते आणि विज्ञानाची कास धरली जाते.

 आज आपल्या देशात अंधश्रद्धा आहे.बऱ्याच अंशी असे म्हणावेसे वाटते की,तर्क कुंठित होतो,तंत्रज्ञान पराभूत होते अशा वेळी नवस,बुवाबाजी,पत्रिका पाहणे या प्रकारांची सुरुवात होते.बऱ्याच प्रमाणात भगतिकता हे अंधविश्वासाचे मूळ आहे.

नराचा नारायण / १४७