पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साधनसंपत्तीची मालकी गमावून बसेल.परागंदा होईल.नष्ट होईल.किंवा यथाकाल त्या अहितकारक रीतीची जागा दुसया रिवाजाने घेतली जाईल.हीच सांस्कृतिक उत्क्रांती.येथे जीनच्या जागी रीत, रूढी,वागण्याची पद्धत या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात.यांना रिचर्ड डॉकिन्स या शास्त्रज्ञाने 'भीम' असा शब्द वापरला आहे.या दृष्टिकोनातून रूढींचा अभ्यास करणे ही समाजशास्त्राची एक वेगळी दिशा ठरेल.
 असा विचार करू लागलो, की हिंदू समाजाच्या संदर्भात डोळ्यांसमोर येते ती गोमाता.भारतात गायी-बैलांची संख्या उदंड आहे.यातील बऱ्याच गायी दूध देत नाहीत किंवा फार कमी देतात.त्या भुईला भार आहेत.त्यांच्यामुळे गवताचा तुटवडा पडतो.तरी आम्ही त्यांना मारत नाही.चांगल्या जोपासू शकत नाही.गायीला न मारण्याची रीत अहितकारक नाही काय? सामान्यपणे आधुनिक आणि धर्मभावनेला तर्कनिष्ठ विचारात स्थान न देणाऱ्या अभ्यासकांमध्ये गोमातेबद्दल आढळणारा दृष्टिकोन हा असा आहे.म्हणजेच 'सांस्कृतिक उत्क्रांतीमध्ये अहितकारक रीती मागे पडतात, नष्ट होतात' या प्रमेयाला हा मोठा अपवादच समजला पाहिजे.हा दृष्टिकोन शंभर टक्के योग्य आहे का ?

 पहिली गोष्ट म्हणजे वैदिक काळात गोमांस खाल्ले जात होते.यज्ञयागामधे इतर प्राण्यांबरोबर गाय-बैल यांचाही बळी दिला जात असे.पशुपालक,भटके आर्य उत्तर वैदिक काळात,स्थानिक मंडळींचे अनुकरण करून कृषिवल झाले.आता स्थिर जीवनामधे मोठी खिल्लारे उरली नाहीत.भन्नाचा मुख्य स्रोत शेती हा झाला.त्यासाठी महत्त्वाची गरज म्हणजे बैल,गोपालकांना बैल फक्त प्रजोत्पत्तीसाठी लागत.त्यांची संख्या अगदी कमी असली तरी चालते.उलट जन्मलेल्या वासरात मात्र निम्मे खोंड असतात.तेव्हा त्यांना मारणे,खाणे रास्त होते.शेतकऱ्याला ते योग्य नाही.आपली गाय साधारण चौथ्या वर्षांपासून पुढे गाभण राहते,भाकड होण्यापूर्वी तिची सरासरी ६ विते होतात.त्यांपैकी ३ बैल. त्यातून २ प्रौढ बैल हाती मिळतात.गाय दर दहा वर्षांनी एक बैल देते आणि बैल १० वर्षे काम केल्यावर म्हातारा होतो असे मानल्यास शेतकऱ्याजवळ बळी देण्यासाठी वा खाण्यासाठी गाय किंवा बैल असतच नाहीत असा निष्कर्ष निघतो.दूध हे दुय्यम उत्पन्न म्हणावे लागते.म्हणून गाय-बैल न मारणे ही विशिष्ट संदर्भात योग्य रीत आहे.

१४६ / नराचा नारायण