पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एकटे पडलो आहोत,नकोसे आहोत,जिण्याला अर्थ नाही अशा भावनेच्या ओझ्या-खाली काळ कंठावा लागतो.आणि वाटते की आयुर्मान वाढले ते याचकरता का?
 पण आदिमानव काळात वयोवृद्धांचे पुष्कळच महत्त्व असणार.कारण त्यांचे तंत्रज्ञान.निसर्गाचा त्यांचा अनुभव शिकार कुठे आणि कधी मिळेल,निरनिराळ्या प्राण्यांच्या वागण्याच्या तन्हा कशा असतील, कोणत्या वनस्पतींचा काय उपयोग.एक ना दोन.ग्रंथबद्ध ज्ञान नाही.तंत्रशिक्षणाची संस्थात्मक सोय नाही अशा कोणत्याही गटात अनुभवाचे मोल फार असणार.विशेषतः आजूबाजूची परिस्थिती फारशी बदलत नसेल तर.तंत्रज्ञानाचे आणि जीवनातल्या प्रश्नांचे स्वरूप झपाटयाने बदलणे ही अगदी विसाव्या शतकातली परिस्थिती आहे.या बदलत्या क्षितिजांवर वृद्धांचे अनुभव जुनाट,अनुपयुक्त वाटतात.म्हणून आज पाश्चात्य समाजात वृद्धांचे प्रश्न बळावतात.
 झाडावरची फळे खाण्याऐवजी शिकार करू लागल्यामुळे माणसात आणि माकडात किती फरक झाले हे आपण पाहिले,पण सगळ्याच गोष्टी बदलल्या नाहीत.काही तशाच राहिल्या.शिकार करणारे प्राणी संधी मिळेल तेव्हा भरपूर खाऊन घेतात आणि मग काही दिवस उपास घडले तरी त्यांना चालतात.लांडगे एका वेळी आपल्या वजनाच्या २० टक्के इतके जेवण घेऊ शकतात.म्हणजे माणसाने डझनभर कोंबड्या खाण्यासारखे आहे.पण माणसाला हे कधी जमले नाही.शिकारी प्राण्यांचा आहार बराचसा एकसुरी असतो.त्यात चवीचे बदल फारसे नसतात.उलट फळे,फुले, पाने,कंदमुळे खाणारी माकडे चवीबाबत संवेदनाशील असतात.गोड,आंबट,तुरट,कडवट अशा अनेक चवी ते अनुभवतात.माणसाच्याही जिमेवरची चवीची संवेदना शिल्लक राहिली.आहाराच्या विविधतेची आवड कायम राहिली.

 मनुष्य निसर्ग परिस्थितीला अनुरूप कसा बनला असावा या प्रश्नाचे काही सूचक पैलू आपण पाहिले.पण मनुष्यजातीची आजची स्थिती कशी आली असावी हे समजून घेण्याची उत्सुकता एवढ्याने भागत नाही.या प्रश्नाला उत्क्रांतिवादामधे सर्वंकष उत्तर आहे असे मानण्याचेही कारण नाही.पण मनुष्याच्या समाजरचनेचा आणि संस्कृतीचा उत्क्रांतीच्या किल्लीद्वारे काही अंशी तरी निसर्गाशी संबंध दाखवता येतो काय हे आता पाहायचे आहे.

नराचा नारायण / १४१