पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असताना नराला जवळ करत नाही. इथेही मानव अपवाद आहे. या काळातील समागमाचा पुनरुत्पत्तीशी संबंध नाही हे लक्षात घेता ही रचना नरनारी बंध अधिक घट्ट करण्यासाठी असावी हा तर्क योग्य वाटतो.
 आदिमानवाच्या समाजरचनेमधे टिकाऊ पतिपत्नी संबंधांचे आणखी एक महत्त्व आहे.माणसामधे आणि माकडांमधे ( किंबहुना सर्वत्रच ) नर आणि मादी यांचे प्रमाण एकास एक असते. पण माकडांत बरेचदा एक नर अनेक माद्यांचा कब्जा घेतो. हरीण, कोंबडा यांचीही अशीच उदाहरणे आहेत. म्हणजेच काही नरांच्या वाट्याला मादीच येत नाही.असे नर योग्य संधीची वाट बघत दिवस काढतात. आदिमानवात अशी रचना टिकणार नाही. कारण मग या अनेक माद्यांच्या दादल्याला शिकारीसाठी सहकारी मिळणार कसे? स्त्रीसुखाला आचवलेले ते इतर नर याला मदत तर करणार नाहीतच. उलट ते याचा काटा काढण्याच्या मागे असतील. तेव्हा प्रत्येक नराला मादी मिळणे सहकार्याकरता आवश्यक आहे.एका नराचा एका मादीवर जीव असणे हे याला पोषक आहे. मादीलाही, नर शिकारीला गेला असताना दुसऱ्या कोणाचा हात धरून पळून जाण्याची बुद्धी होऊ नये. कारण अशी वागणूक पसरू लागली तर नराचा विश्वास उडेल.आपली पत्नी आणि कच्चीबच्ची यांच्याकरता अन्न आणण्यासाठी तो आटापिटा करणार नाही. रचना कोलमडून पडेल. पण ती पडली नाही.
 तेव्हा या आदिमानवापासून कुटुंबसंस्था अस्तित्वात आली असणार. राहुल सांकृत्यायन यांनी १९४५ साली 'होल्गा से गंगा' या पुस्तकात गोष्टीरूपाने मानवाच्या उत्क्रांतीचा इतिहास सांगितलेला आहे. त्यात आदिकालावरच्या पहिल्याच कथेत, माणसे स्त्रीच्या नेतृत्वाखाली टोळ्यांमधे राहत असावीत, या स्त्रीचे तिच्या टोळीतील सर्व पुरुषांशी संबंध असावेत अशा गोष्टी गृहित धरून चित्रण केलेले आहे. शास्त्रज्ञांना आज मान्य असलेल्या सिद्धांतानुसार हे चूक म्हणायला हवे. खरोखरच नवीन संशोधनाच्या संदर्भात 'पुनश्च व्होल्गा ते गंगा' लिहिण्याची आता गरज आहे.

 शिकारीवर आधारित आदिसमाज रचनेमधे पुरुषांचे आपसातील संबंध आणि स्त्रियांचे आपसातील संबंध यात बराच फरक असणार. शिकार हे कौशल्याचे, कष्टाचे आणि धैर्याचे काम आहे. नको तिथे धडपडून, आवाज करून बावळटपणाने वागणारा

माकडापासून माणूस / १३९