पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 बहुतेक प्राण्यांत समागमकाल दोन अर्थानी मर्यादित असतो.एकतर समागम फक्त मादी माजावर असताना होतो.गायीच्या बाबतीत हा काळ तिच्या पुनरुत्पत्ती चक्रातील दोन किंवा तीन दिवस असतो.शेतकऱ्यांना तेवढ्या काळात धावपळ करून वळू आणावा लागतो.(तो कायम तयार असतो. )किंवा कृत्रिम रेतनाची व्यवस्था करावी लागते.याला माणूस अपवाद आहे.माणसाची मादी जवळजवळ सर्व काळ समागमात सहभाग घेऊ शकते.एकमेकाची ओढ टिकण्याला याची मदत होते.प्रत्यक्ष समागमक्रियेचा काळही माणसामधे बराच जास्त असतो.कोंबड्यांमधे तो दोन ते तीन सेकंद असतो तर माकडांमधे पाच ते सहा. शिवाय या माद्या समागम-क्रीडेनंतर, जणू काही झालेच नाही अशा अविर्भावात असतात.कोंबडी क्षणभर पंख फडफडावून पुन्हा दाणे टिपायला लागते तर माकडीण फळे शोधायला जाते. मानवी मादी मात्र रतिक्लांत अवस्थेत बराच काळ राहते.याचा आणखी एक उपयोग असा की,त्या निजलेल्या अवस्थेत,शुक्रजंतूना तिच्या शरीरात योग्य तो कार्यभाग साधायला अवधी मिळतो.ती उठून चालायला लागली,तर गुरुत्वाकर्षणामुळे शुक्रजंतूंच्या प्रवासाला अवरोध होईल.
 मानवी मादीच्या उरोजांचा विकासही याच उपयोगाकरिता झाला असावा.सर्व सस्तन प्राण्यांमधे मादीच्या स्तनांचे मुख्य काम म्हणजे पिल्लांचे पोषण.त्यामुळे या उद्देशाला अनुरूप असाच स्तनांचा आकार असतो.मानवामधे उन्नत उरोजांना महत्त्व दिले जाते.वस्तुतः पुरेसे दूध येण्याचा आणि उरोजांच्या मोठेपणाचा संबंध नाही.शिवाय मोठा आकार बाळाच्या दुग्धपानाला अडचणीचा ठरतो.काही वेळा या आकारामुळे बाळाला श्वास घेण्याला अडचण होते.यापेक्षा दुधाच्या बाटलीचा आकार जास्त अनुरूप असतो.चतुष्पाद प्राण्यांमधे नर मादीच्या नितंबांकडे आकर्षित होत असेल.अनेक माकडांमधे नितंबांवर खास रंग,फुगवटे इत्यादी असतात.द्विपाद झालेल्या मानव-मादीच्या बाबतीत हे काम उन्नत उरोज करतात.

 माणसाची वंशवृद्धी निर्विघ्नपणे होण्याकरता नरमादी किती काळ एकत्र राहणे आवश्यक आहे ? त्यांची पिल्ले स्वावलंबी बनेपर्यंत म्हणजे पिल्लाच्या जन्मापासून पंधरा वर्षे.पण या काळात मादी बराच काळ गर्भार असणार.मग समागमातून जोडी टिकते असे मानल्यास गर्भारपणात काय व्हावे ? बहुसंख्य प्राण्यात मादी गर्भार

१३८ / नराचा नारायण