पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

घेता आली किंवा इतर प्राण्यांनी अर्धवट खाऊन टाकलेली शिकार सापडली तर तीही घेणे.मग हळूहळू, अन्नासाठी दाही फिरणाऱ्या या प्राण्यात बदल व्हायला लागले.परिस्थितीशी जुळवून घेऊ लागला.प्रथम तो दोन पायांवर उभा राहून चालू लागला.झाडावर असताना फांद्या पकडण्याचे काम हाताच्या बरोबरीने पायही करत असत.आता पाय खास पळण्यासाठी, चालण्यासाठी वापरले जाऊ लागले.पायाचा अंगठा जाड नि घट्ट झाला. हाताच्या अंगठ्यापेक्षा वेगळा झाला.पण पावले घोडा,हरीण यांच्यासारखी घडली नाहीत.माणसाला खूर आले नाहीत.मऊ पावले कमीत कमी आवाज करत,लपत छपत जाण्याला योग्य अशी राहिली.उभ्याने पळताना हातास शस्त्र धरणे शक्य झाले.
 पण इतर शिकारी प्राण्यांपेक्षा अनेक बाबतीत हा आदिमानव मागे होता.त्याची नजर तेवढी तीक्ष्ण नव्हती. म्हणजे सूक्ष्म हालचाली ओळखणे त्याला जमत नव्हते.त्याचे डोळे झाडावरची स्थिर फळे,फुले ओळखण्यात पटाईत होते.त्याला रंगांचे फरक कळत.पण कुत्र्याप्रमाणे वासावरून माग काढणे त्याला जमत नव्हते.कुत्र्याचे घ्राणेंद्रिय माणसापेक्षा सुमारे शंभर पट संवेदनाशील आहे.म्हणून तर पोलीस गुन्हे-गाराच्या एखाद्या कपड्याच्या वासावरून कुत्र्याला त्याचा शोध करायला सोडतात.माणसाला चटकन् चाहूल लागत नव्हती.माणसाजवळ शिकारी प्राण्यांसारखे सुळे,नखे वगैरे अवयव नव्हते.ते आलेही नाहीत.या अडचणींवर मात करता आली ती मेंदू वापरून शिकार गटागटांनी होऊ लागली.त्यामुळे मोठे प्राणी हेरणे, त्यांना पेचात पकडणे आणि मारणे शक्य झाले.

 पण शिकारीत एक अडचण असते.ती म्हणजे अनिश्चिती. शिकारीचा काळ,शिकारीची जागा दोन्ही नक्की नसतात.मग आपल्या पिलावळीचे काय करावे? त्यांना अर्थातच सुरक्षित जागा हवी.जमिनीवर माणसाच्या पिल्लाला काहीच संरक्षण नाही.छोटासा कोल्हा किंवा कुत्रासुद्धा त्याला मारून नेईल.तेव्हा सुरक्षितपणे एखाद्या गुहेत त्यांना ठेवले पाहिजे.शिवाय जरूर तेव्हा त्यांना दूध पाजायला आई हवीच.अशा तऱ्हेने घर या संस्थेचा जन्म असावा.म्हणजे नरांच्या गटाने शिकार करून आणायची आणि माद्यांनी पिल्ले राखायची.तसेच अन्न,जळण वगैरे गोष्टी गोळा करून आणायच्या.

माकडापासून माणूस / १३५