पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तर दुसरीत ५७ पैकी २.यावरून निष्कर्ष असा काढता येईल की,वळीव पाऊस जसा रस्त्याच्या या बाजूला आहे तर त्या बाजूला नाही,असा पडतो तसा फ्लूच्या जंतूंचा वर्षाव झाला असला पाहिजे,हे शक्य आहे का ?
 वादळी पावसाच्या थेंबाबरोबर जंतू खाली आले तर ते पाण्याबरोबर वाहून जाण्याची शक्यता खूप जास्त. उलट थेंबांबरोबर ते खाली येत असताना मधेच त्या थेंबांची पुन्हा वाफ झाली,तर या जंतूंचे भविष्य जमिनीजवळच्या वाज्याच्या झुळुकांवर अवलंबून असेल.या वाज्यावर टेकड्या,उंच इमारती, धुराडी यांचाही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कदाचित टेकडीच्या माथ्यावरचे वर्ग जंतूंपासून वाचले असतील.
 जंतूंचा वर्षाव होत असताना नुसता पाऊस पडेल, तर आजार कमी पसरेल.पण पाऊस आणि वारा यांची जोडी जमली तर ती जंतूंना अनुकूल ठरेल.हा तर्क कसा तपासता येईल ? त्या त्या दिवशीचा पाऊस गुणिले त्या दिवशीचा वाज्याचा सरासरी वेग असा जंतू प्रसारानुकूलता निर्देशांक काढता येईल.तो जास्त असेल त्या दिवसां-मधे जास्त लागण होईल.म्हणजेच त्यानंतर दोन-तीन दिवसांनी नवीन रोग्यांची संख्या खूप वाढेल.रोजची नवीन रोग्यांची संख्या आणि रोजचा निर्देशांक असा काढलेला आलेख बराचसा या तर्काबरोबर जुळतो.
 जंतू आभाळातून पडत असतील आणि त्यांनी तडक मानवी शरीरात श्वसनमार्गा-वाटे प्रवेश करणे रोगप्रसारासाठी आवश्यक असेल तर जंगलांत त्यांचा परिणाम फारसा होणार नाही.कारण जंतू बरेचसे पानावर अडकतील.त्यामुळे दाट झाडीत वावरणाऱ्या माकडांना यांचा फारसा त्रास होणार नाही.जंगल आणि झाडी सोडून गवताळ प्रदेशात राहू लागलेल्या माणसाला मात्र त्यांचा बराच त्रास होईल.त्यामुळे माणसाच्या बाबतीत या जंतूंपासून बचाव करणाऱ्या कोणत्याही बदलाचा उत्क्रांती- तत्त्वानुसार प्रसार होईल.असा बदल म्हणजे ज्या छिद्रांवाटे श्वास घ्यायचा त्यांच्या-वरती छप्पर बनवणे. आपले नाक हे असे इंद्रिय आहे.माकडाला आपली श्वसने छिद्रे अशी झाकावी लागत नाहीत.तेव्हा नाक नसून त्याचे काही बिघडत नाही.

 या नाकापलीकडे उत्क्रांतिवादात या जंतूंना आणखी काही महत्त्व आहे काय ? आहे.अगदी मूलभूत महत्त्व आहे.एकतर पृथ्वीवरील जीवसृष्टीची सुरुवात त्यांच्यामुळे झाली असण्याची शक्यता आहे.त्याशिवाय,जीवांच्या जीन्समधे होणारा बदल,खरे

धूमकेतूंचे आव्हान / १२७