पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पाताने रोगी मरे.त्यातूनही वाचला तर त्याची बोटे, गुप्तद्रिये झडत.पूर्ण विस्मृती होत असे.या साथीत अथेन्स शहरात मुडद्यांचा खच पडला.कुत्रे,कावळे प्रेतांना तोंड लावेनात.ज्यांनी प्रेतांचे लचके तोडून खाल्ले ते प्राणी आणि पक्षी मेले,या रोगाच्या जंतूंचा पुन्हा पाऊस पडलेला दिसत नाही.
 रोमन साम्राज्याचा अंत कशामुळे झाला या प्रश्नाला अनेकांची अनेक उत्तरे आहेत.कोणी म्हणे शिशाच्या नळांमधून येणारे पाणी पिऊन सर्व कर्त्या पुरुषस्त्रियांना विषबाधा झाली.कोणाच्या मते दहा लाख वस्तीच्या रोमला परप्रांतातून धान्याचा पुरेसा पुरवठा होऊ शकला नाही.कोणाच्या मते उत्तरेला जर्मनी वगैरे भागातील आदिवासींच्या लाटांना रोमन सैन्य रोखू शकले नाही.पण इसवी सनाच्या पाचव्या शतकात आधीच्या सात-आठशे वर्षांपेक्षा फार मोठ्या प्रमाणावर रोगाच्या साथी रोम-मधे आल्या हे एक महत्त्वाचे कारण असणार.रोगजर्जर रोम शत्रूच्या हल्लयापुढे टिकाव धरू शकले नाही.
 रोगांच्या साथी शेकडो वर्षांच्या अंतराने पुन्हा पुन्हा निर्माण होतात हे आपण पाहिले.भौगोलिक प्रसारातही अनेक कुतूहलजनक प्रकार दिसतात.एकमेकापासून हैजारो मैल दूर असलेल्या ठिकाणी एकाच वेळी साथ सुरू होऊ शकते.उलट अगदी जवळ असलेल्या,एकमेकाशी संपर्क असलेल्या गावांमधे मात्र ती एकाच वेळी येईल असा भरंवसा देता येत नाही.काही वेळा अगदी जवळच्या दोन ठिकाणांपैकी एक रोगप्रस्त होते तर दुसरे पूर्णपणे वाचते.याचे एक टोकाचे उदाहरण पाहून हा विषय संपवू.

 १९७७-७८ सालातल्या फ्लूच्या साथीत केलेल्या शाळापाहणीत काही फार असंभवनीय घटना उजेडात आल्या.एका शाळेच्या दोन वसतिगृहांमधे फक्त १०० यार्ड अंतर होते.एका वसतिगृहात ५१ पैकी २६ विद्यार्थी आजारी पडले.दुसऱ्यात ४९ पैकी १०.हा फरक योगायोगाने घडण्याची शक्यता एक टक्कासुद्धा नाही.एका शाळेत वरच्या इयत्तांचे वर्ग टेकडीच्या उतारावर तर खालच्या इयत्तांचे वर्ग टेकडीच्या माथ्यावरील इमारतीत होते.उतारावरील इमारतीतील २८९ पैकी १०९ विद्यार्थी आजारी पडले तर माथ्यावरील इमारतीतील १२१ विद्यार्थ्यांपैकी एकही आजारी पडला नाही.एका शाळेच्या दोन इमारतीपैकी एकीमधे ५५ पैकी ३५ आजारी पडले

१२६ / नराचा नारायण