पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

झपाळ्याने ग्रासले. या सगळ्यावरून हॉइल - विक्रमसिंघे निष्कर्ष काढतात की,फ्लू आभाळातून ढगांसारखा उतरला. संसर्गाने पसरला नाही. एरवी माणसांची प्रचंड जा-ये असून शिकागो नि न्यूयॉर्कमधे तो झटकन शिरला नाही.पण मनुष्यसंपर्का-पासून दूर असलेल्या मेंढपाळापर्यंत तो पोचला याचे काय स्पष्टीकरण देता येईल ?
 फ्लूच्या जंतूंमधे वेगवेगळ्या जाती आढळतात.एका साथीमधे साधारण एकाच जातीचे जंतू असतात.त्यांचा आपल्याला उपद्रव झाला की, शरीरात त्यांच्या विरोधी रसायने बनून राहतात.पण या संरक्षण योजनेचा दुसन्याच जातीच्या फ्लू व्हायरस -विरुद्ध उपयोग होत नाही.१९५७ साली आशियात एक नव्याच जातीचा फ्लू आला.या जंतूंचा प्रतिकार करू शकतील अशा तथाकथित अँटीबॉडीज युरोपात तरुणांच्या रक्तात नव्हत्या.पण हॉलंडमधे पंचाहत्तरीच्या पुढे असलेल्या अनेक वृद्धांच्या शरीरात त्या आढळल्या.याचा अर्थ,हीच जंतूंची जात पाउणशे वर्षांपूर्वी हॉलंडवर हल्ला करून गेली होती.पुढे साथ संपली.जंतू अदृश्य झाले ते आता पुन्हा कसे निर्माण झाले ?मध्यंतरीच्या काळात सापडलेले जंतू अगदीच वेगळ्या प्रकारचे होते.मग ते पुन्हा जुन्या वळणावर कसे गेले? गुणबदलाने ? पण गुणबदलामुळे नेमकी पूर्वीची रचना पुन्हा निर्माण होण्याची शक्यता फार कमी.उलट एका विशिष्ट धूमकेतूपासून विशिष्ट प्रकारचे फ्लू जंतू पृथ्वीवर येत असावेत आणि पाउणशे वर्षां-नंतर तो धूमकेतू पुन्हा पृथ्वीजवळ आला असावा. हे तर्क म्हणून ठीक आहे.पण प्रत्यक्षात असा धूमकेतू आहे का ? हॅलेचा धूमकेतू सुमारे पाउणशे वर्षांतून एकदा पृथ्वीला भेटतो.

 डिसेंबर १९७७ मधे इंग्लंडमधे फ्लूची साथ आली. हा रोग संसर्गाने पसरतो काय याचा शोध या साथीतून घ्यावा असे हॉइल- विक्रमसिंघे यांना वाटले.पण असे कोणतेही प्रयोग करण्याला सार्वजनिक आरोग्यखात्याच्या अधिकाऱ्यांनी नैतिक मुद्यांवर विरोध दर्शवला.मग इतर पर्यायांचा विचार झाला.समजा,पतीपत्नींपैकी कोणाला तरी फ्लू झाला, तर संसर्गाने दुसन्याला होण्याची शक्यता खूपच जास्त असणार.म्हणजेच दोघेही फ्लू पासून बचावतील तरी किंवा दोघेही आजारी पडतील.दोघांपैकी एकजणच आजारी अशी कुटुंबे कचित दिसतील.प्रत्यक्षात मात्र केवळ एकजण आजारी पडलेल्या जोडप्यांचे प्रमाण अपेक्षेपेक्षा बरेच जास्त दिसले.

धूमकेतूंचे आव्हानं / १२३