पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ढगांच्या स्वरूपात जमिनीवर येणाऱ्या जंतूंच्या परिणामाबाबत काही भाकिते करता येतील.एखाद्या छोट्याश्या वस्तीला असा ढग भिडेल तर तो तिला पूर्ण गिळून टाकेल.उलट प्रचंड विस्ताराच्या महानगरावर तो उत्तरेल तेव्हा महानगराचा एखादा हिस्सा त्या ढगाच्या प्रभावाखाली येईल.म्हणून खेड्यात आजार झाला तर तो सगळ्या गावात एकदम येईल.शहरात मात्र तो एखाद्या पेठेत किंवा विभागात येईल.शहराचे आकारमान जास्त असल्याने तितक्याच आकारमानाच्या पण विखुर-लेल्या खेड्यांच्या तुलनेने शहराला रोगाचा फटका बसण्याची शक्यता जास्त असेल.रोगग्रस्त मुलुख हा रोगमुक्त मुलखापेक्षा बरेचदा लहान असेल.अशा वेळी रोगग्रस्त भागातून निघालेला प्रवासी रोगमुक्त गावाला जाण्याची शक्यता जास्त.त्या गावावर नंतर जंतूंचा ढंग उतरला तरी या प्रवाशावर खापर फोडले जाण्याची शक्यता फार.समजा,मुंबईला फ्लूची खूप लागण आहे.पण मद्रासवर फ्लूचा ढग आणखी दहा दिवसांनी पोचणार आहे. दरम्यान काही फ्लूग्रस्त मुंबईकर मद्रासवारी करून आले.त्यानंतर लगेचच मद्रासमधे फ्लूचे रोगी मोठ्या प्रमाणावर दिसू लागले.साहजिकच मुंबईकरांनी मद्रासला फ्लू आणला असा समज होईल.रोगप्रसारशास्त्रामधे (एपिडे- मियॉलॉजी) असे अनेक अभ्यास आढळतात.
 याचा अर्थ काय ? रोग संसर्गजन्य नसतातच असे नव्हे. पण रोग संसर्गजन्य नसूनही तसा समज होणे शक्य आहे.हॉइल आणि विक्रमसिंघे यांनी सर्दी नि फ्लू या दोन रोगांचा या दृष्टीने अभ्यास केला.

 दोन व्यक्तींवर आकाशातून येणाऱ्या जंतूंनी एकदम हल्ला केला तर त्यांच्यामधे एकाच वेळी रोगाची लक्षणे दिसू लागतील.उलट एकाच्या संसर्गाने दुसऱ्याला रोग व्हायचा असेल तर प्रथम दुसऱ्याच्या शरीरात जंतूंचा प्रवेश व्हायला लागेल.मग त्यांची पुरेशी वाढ होईल व नंतरच रोगाची लक्षणे दिसू लागतील.शरीराच्या दर घन सेंटिमीटर भागात व्हायरसचे दहा अन्ज कण जमल्यावर रोग बळावलेला दिसतो असे मानले आणि व्हायरसची संख्या दर दोन तासांनी दुप्पट होते असे मानले तर रोगलक्षणे दिसण्याकरता दोन-तीन दिवस लागतील.म्हणजेच संसर्गाने होणारा रोग- प्रसार खूपच सावकाश असेल.उलट अनेक साथी यापेक्षा खूपच वेगाने वाढलेल्या दिसतात.

धूमकेतूंचे आव्हान / १२१