पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भांग आहेत. हा प्रयोग पुढे अनेकांनी तपासून पाहिला. शेवटी एकमत झाले की,हैड्रोजन, नायट्रोजन, पाणी वगैरेंच्या मिश्रणामधे सेंद्रीय आणि जीवसृष्टीला पायाभूत ठरणारे पदार्थ बनवण्याकडे कल असतो. हीच गोष्ट सिद्ध करणारा आणखी एक पुरावा शास्त्रज्ञांना सापडला तो उल्कांच्या अभ्यासातून.
 आभाळातून 'तारा' तुटून पडताना कधीतरी नजरेला पडतो. प्रत्यक्षात तो तारा नसून सूर्यमंडलामधे फिरणारा एखादा खडक पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणात सापडून जमिनीकडे ओढला जाताना हवेशी होणाऱ्या घर्षणाने तापून चकमकत असतो. अशा उल्का सततच पृथ्वीवर पडत आल्या. शास्त्रज्ञांनी सुमारे १७०० उल्कांचा अभ्यास केला आहे. यांपैकी किमान ३५ टनभर किंवा जास्त वजनाच्या आहेत. या बहुतेकां-मधे सेंद्रीय द्रव्ये सापडत नाहीत. कार्बोनेशस कॉन्ड्राइट नावाच्या प्रकारातील दुर्मिळ उल्कांमधे मात्र सेंद्रीय द्रव्ये सापडतात. पण ही तपासणी या उल्का जमिनीवर पडल्यावर लगोलग करायला हवी. एरवी तपासणीत सापडलेले पदार्थ पृथ्वीवरून च त्या दगडात शिरले असतील काय, असा शंकेचा भुंगा उरतो. असा अभ्यास दोन वेळा करता आला. १९५० साली अमेरिकेत केंटकी राज्यात मरे नावाच्या गावी आणि १९६९ मधे ऑस्ट्रेलियात मर्चिसन नावाच्या गावी अशा उल्का शास्त्रज्ञांच्या हाती त्या जमिनीवर पोचल्यापासून फार लवकर आल्या. या दोन्हीमधे मिळून १८ वेगवेगळी अमीनो अॅसिडस नि १७ वेगवेगळी फॅटी अॅसिडस सापडली. अमीनो अॅसिडसमधे डेक्स्ट्रो आणि लीन्हो असे दोन प्रकार असतात.जीवसृष्टीत फक्त लीन्हो प्रकार आढळतो, पण प्रयोगशाळेत बनताना दोन्ही निम्मी निम्मी बनतात.या उल्कांमधे दोन्ही प्रकार निम्मे निम्मे होते, फॅटी अॅसिडच्या अणूमधे कार्बनचे परमाणू अर्ध्या वेळा समसंख्येने आणि अर्ध्या वेळा विषम संख्येने असतात.जीवसृष्टीत फक्त समप्रकार सापडतो.उल्कांमधे दोन्ही प्रकारची फॅटी अॅसिडस बरोबरीने होती.यावरून निष्कर्ष निघतो की, विश्वाच्या पोकळीत ही संयुगे बनण्याची प्रक्रिया आपल्या प्रयोगशाळेसारखीच असावी.खास वेगळे जीवतत्त्व कल्पण्याची गरज नाही.

 तेव्हा सारांशाने असे म्हणता येईल की, पृथ्वीवर फार सुरुवातीला हैड्रोजन,नायट्रोजन, मिथेन, अमोनिया, पाण्याची वाफ या तऱ्हेच्या मिश्रणापासून अतिनील किरणांच्या वा अन्य ऊर्जेच्या प्रक्रियेतून निरनिराळे सेंद्रीय पदार्थ घडले.यातच

धूमकेतूंचे आव्हान / ११७