पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

केले की, माशा अंडी घालतात म्हणून अळया पडतात.स्वयंभूपणे नव्हे.१६७५ मधे अँटोन व्हान ल्यूबेनहॉक या गृहस्थाने काच घासून भिंगे बनवण्याची कला आत्मसात केली.भिंगांमधून त्याला सूक्ष्मजीवांचे विश्व दिसू लागले. सूक्ष्मदर्शक भिंगां- मुळेच मायक्रोबायॉलॉजी किंवा सूक्ष्मजीवशास्त्र जन्माला आले.या भिंगांमधून पाहता लक्षात आले की, सडक्या मांसात अळ्या पडल्या नाहीत तरी सूक्ष्मजीवांची वळवळ उघड दिसते.हे कोठून आले ? मटण पाण्यात उकळून वरचे पाणी घेतले तर त्यात सूक्ष्मजीव दिसत नाहीत.पण हे पाणी उघड्यावर ठेवले तर काही दिवसांनी त्यात सूक्ष्मजीव तरंगताना दिसू लागतात.हे कोठून आले ! गाडी पुन्हा स्वयंभू जन्माकडे गेली.१७६७ मधे इटालियन वनस्पती शास्त्रज्ञ लाझारो स्पालांझानी याने वेगळेच प्रयोग केले. मटणाचे पाणी भरलेल्या बाटल्या त्याने हवाबंद करून टाकल्या.सील केल्या.त्यांच्यात सूक्ष्मजीव निर्माण झाले नाहीत.पण बाटल्यांची बुचे काढून टाकली तर लवकरच सूक्ष्मजीव निर्माण होत.यावरून निष्कर्ष निघाला की, हवेमधे काही- तरी ' जीवतत्व' असले पाहिजे. १८३६ साली जर्मन शास्त्रज्ञ थिओडोर वाम याने दाखविले की आधी भरपूर गरम केलेली हवा मटणाच्या पाण्याच्या संपर्कात आली तरी जीव निर्माण होत नाहीत.म्हणजेच तापवण्यामुळे हवेतील जीवतत्त्व नाश पावत असावे.१८६४ साली फ्रेंच शास्त्रज्ञ लुई पाश्चर याने अशा प्रयोगांसाठी आडव्या या अक्षराच्या आकाराची मान असलेल्या बाटल्या वापरल्या.प्रथम लांबलचक मान असलेली बाटली घेऊन ती मान तापवून हवी तशी वाकवता येते.या नळीतून हवा आतील मटणाच्या पाण्याला भेटण्यास जाईपर्यंत हवेतील धूलीकण नळीला जागोजाग चिकटून राहात.ही हवा न तापवता आत जाई.पण सूक्ष्मजीवनिर्मिती होत नसे.यावरून दिसले की तथाकथित जीवतत्त्व हवेत नसून धुळीच्या कणांमधे असणार.

 पण धुळीच्या कणांमधे तरी जीव कसा बनतो ? निर्जीव कण योगायोगाने एकत्र येऊन ? असे योगायोग प्रत्यक्ष घडायला काळ किती लागेल ? बायबलवर आधारित हिशेबाप्रमाणे पृथ्वी ६००० वर्षे वयाची आहे.तेवढा काळ पुरेल का ? १८९० साली रेडिओअॅक्टिव्हिटीचा शोध लागला.त्यावर आधारित हिशोब बघता पृथ्वीचे बय फारच वाढले.आता शास्त्रज्ञ म्हणू लागले की, पृथ्वी ४६० कोटी वर्षे जुनी असावी.म्हणजे योगायोग घडण्याला काळ तर भरपूर मिळाला.पण एव्हाना जीव-

११४ / नराचा नारायण