पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रकरण सातवे


लायसेंकोचा उदयास्त


 डार्विनने उत्क्रांतिवादाचा सिद्धांत मांडल्यावर अनेक वादळे झाली. धर्मगुरूंनी डार्विनच्या नावाने बोटे मोडली. समाजधुरीणांनी त्याला लाखोली वाहिली. अमेरिकेत शाळेत उत्क्रांतिवाद शिकवण्यावरून कोर्टकचेऱ्या झाल्या.सामाजिक विचारवंतांनी उत्क्रांतिवादाचा वेगवेगळ्या प्रकारे अर्थ लावला. स्पेन्सर आणि त्याच्या अनुयायांना उत्क्रांतिवादात समाजातील विषमतेला वैज्ञानिक अधिष्ठान सापडले. तर कोपॉटकिनला सहकार ही उत्क्रांतीची महत्त्वाची प्रेरणा वाटली. ही सर्व वादळे यथावकाश शमली आणि वैज्ञानिकांनी सर्वसाधारणपणे उत्क्रांतिवाद मान्य केला. पण डार्विनचे नाव घेऊन शास्त्रज्ञांच्या एका गटाचे शिरकाण करण्याचे भीषण नाट्य फक्त सोवियट रशियामधे दुसऱ्या महायुद्धापूर्वीच्या दहाबारा वर्षांत घडले. या रक्तलांछित नाट्याचा नायक ( का खलनायक ? ) होता त्रोफीम डेनिसोव्हिच लायसेंको.

 राज्यक्रांतीनंतरच्या काळात लेनिन आणि बोल्शेविक पक्षाच्या इतर नेत्यांनी

१०२ / नराचा नारायण