पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उत्तेजन देणे, त्याच्यासाठी अनुकूल कायदे करणे हे मात्र शक्य आहे. नको असताना गर्भधारणा झाली तर गर्भपात करू देता येईल. दहा-बारा वर्षांपूर्वी भारतात गर्भपात कायदेशीर झाला. अर्थात कॅथॉलिक ख्रिश्चनांसारखे काही समाज गर्भपाताच्या विरोधी आहेत. किंबहुना कोणत्याही कृत्रिम गर्भनिरोधक तंत्राच्या वापराला फारसे अनुकूल नाहीत. काही वेळा होऊ घातलेले मूल अपंग, वेडसर वगैरे असण्याची शक्यता वाटली तर डॉक्टर गर्भपाताचा सल्ला देऊ शकतात. यालासुद्धा काहींचा विरोध असतो. अशाच एका गोष्टीत एक डॉक्टर दुसऱ्याला विचारतो की, एका दांपत्यात बायको दारुडी आणि क्षयी आहे. बापाला सिफिलीस हा गुप्तरोग झालेला आहे. आधी एक आंधळे, एक मुके- बहिरे अशी मुले झालेली आहेत आणि बाईला पुन्हा दिवस गेलेत. तिला गर्भपाताचा सल्ला द्यावा की नाही ? दुसरा डॉक्टर ताडकन् म्हणतो की, जरूर गर्भपाताचा सल्ला द्यावा. त्यावर पहिला टोलावतो की, हा गर्भपात केला असता तर जग लुडविग फॉन बिथोव्हेन या लोकोत्तर संगीतकाराला मुकले असते. माझ्या मते सुद्धा फार टोकाची भूमिका झाली. न जाणो जन्माला येऊ घातलेले मूल ज्ञानेश्वरी- सारखे असेल अशा शंकेकरता गर्भपात बंद करण्यापेक्षा जन्माला आलेल्या मुलां- मधील गुणी बालके वेचून त्यांच्या विकासासाठी खास प्रयत्न करणे हे जास्त व्यवहार्य होईल.

 भविष्यकाळामधे कदाचित हव्या त्या गुणधर्मानी युक्त अपत्य मिळवणे शक्य होईलही. असे झाल्यास आपण कशा प्रकारची माणसे घडवू ? सर्वांनाच संगीतकार करू का ? काहींना शास्त्रज्ञसुद्धा ? खेळाडूही हवेतच आणि राजकारणी ? का त्यांची अडचणच आहे समाजाला ! आणि कामगार ? विशेषतः कष्टदायक, अप्रिय कामे करणारे ? सगळेजणच शास्त्रज्ञ आणि संगीतकार असले, तर सफाई कोण करणार ? हे प्रश्न हास्यास्पद नाहीत. आल्डस हक्सले या कादंबरीकाराने ( हा डार्विनचा बुल- डॉग टॉमस हक्सले याचा नातू) अशा एका समाजाचे 'ब्रेव्ह न्यू वर्ल्ड' या कादंबरीत चित्रण केलेले आहे. ते फार अंतर्मुख व्हायला लावणारे आहे.

सुप्रजजनन / २०१