पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दिसतात. तेव्हा नसबंदीने त्यांच्या प्रसारावर परिणाम होण्याची शक्यता कमी.अनेक मानसिक रोगांबाबत ठामपणे फारसे काहीच सांगता येत नाही.जे रोग डॉमिनंट जीन्समुळे होतात आणि शरीराला अघू बनवतात किंवा मृत्यूला कारणीभूत होतात त्यांच्याबाबत नसबंदीची गरज राहत नाही.जे रोग रिसेसिव्ह जीन्समुळे होतात त्यांची गोष्ट आणखीनच वेगळी. ज्यांना डबल डोस मिळून या जीन्सचा दृश्य परिणाम भोगावा लागतो त्यांची संख्या कमी असते.तर ज्यांच्या शरीरात अशा जीन्स दड- लेल्या असतात अशांची संख्या फार जास्त असते.हे लोक ओळखू येत नाहीत.यांना वगळून बाकीच्यांची नसबंदी करण्याचा फारसा उपयोग नाही.
 गुन्हेगारी, बेकारी यांसारख्या गोष्टींमधे अनुवांशिकतेपेक्षा सामाजिक नि आर्थिक स्थितीचा वाटाच जास्त महत्त्वाचा आहे. श्रीमंत राष्ट्रांमधे नोकरीची संधी असूनही बेकारभत्त्यावर आळशीपणे काळ काढणारे महाभाग असतात, नाही असे नव्हे. पण हे अपवादच. सर्वसामान्यपणे बेकारीच्या गर्तेतून बाहेर पडण्याची संधी कोणी सोडत नाही. तेव्हा बेकारांची नसबंदी म्हणजे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असे होईल. गुन्हेगारीचेही बऱ्याच अंशी समाजशास्त्रीय विश्लेषण करता येईल. नसबंदीने गुन्हेगारी कमी होईल या मताला पुष्टी देणारा सबळ पुरावा सापडत नाही.
 मोठा थोरला पोरवडा असण्यामागेसुद्धा सामाजिक मीमांसाच आहे. शिक्षण वाढले,स्त्रिया पूर्ण वेळ काम करू लागल्या, लग्नाचे वय पुढे ढकलले गेले तर मुलांची संख्या घटेल. आर्थिकस्तर सुधारला, मुलांची मदत, त्यांची कमाई यांवर कुटुंब अवलंबून नसले, तर जास्त मुलांची गरज वाटणार नाही, आरोग्य सुधारले, बालमृत्यू घटले तर स्त्रिया वारंवारची बाळंतपणे टाळतील. अहमदनगर जिल्ह्यात ४० खेड्यात पसरलेल्या, डॉ. रजनीकांत आरोळ्यांच्या आरोग्यप्रकल्पामधे असे बदल घडले आहेत असे मानले जाते. शिवाय जाणीव जागृती, विकास यांसारख्या कूर्मगती-मार्गांऐवजी झटपट नसबंदी करू पाहणाऱ्या शासनाची स्थिती काय होते हे आणीबाणीनंतरच्या निवड- णुकीने भारताला दाखवून दिले आहे. कोणत्याही नसबंदी कायद्यामुळे शासन-यंत्रणेच्या हाती येणारी पाशवी सत्ता, व्यक्तिस्वातंत्र्य आणि मानवी प्रतिष्ठा यांची होणारी धुळधाण यांची भरपाई तथाकथित सामाजिक प्रगतीमुळे होणे अवघड दिसते.

 सक्तीची नसबंदी बाजूला ठेवली, तरी कुटुंबनियोजनाचा प्रचार करणे, त्याला

१०० / नराचा नारायण