पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माणसे सारखी नसतात हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ सत्य आहे. तेव्हा राजकीय विचारप्रणालीतील समतेचा अन्वय ' एक मूल्यविचार' या अर्थानेच लावावा लागतो.समान आहे ती माणसांची प्रतिष्ठा समान आहेत ते सर्वांना लागू असलेले कायदे आणि नियम, समान असायला हवी ती व्यक्तिविकासाची संधी समता हवी ती आर्थिक सत्ता आणि सुबत्ता यांमधे. साम्यवाद्यांनी 'हातून होईल ते काम आणि गरज असेल तसा दाम ' ही कल्पना मांडली तिचाही असाच अर्थ लावता येईल.गुणवत्तेच्या बाबतीत माणसामाणसांत फरक आहे आणि काही प्रयत्नांनी पुढच्या पिढीची गुणवत्ता वाढवायची आहे असे ठरल्यावर कल्पना निघाली की, जे लोक समाजाला अहितकारक, धोकादायक गुणधर्म आणि प्रवृत्ती असलेल्या अपत्यांना जन्म देणार असतील त्यांना प्रतिबंध करावा. सक्तीची नसबंदी करावी. पण असे लोक कोण ? वेडे, दारूडे, लफंगे, महारोगी, क्षयरोगी, गुप्तरोगी, फेफरं येणारे, गुन्हे करणारे हे सगळे बाद लोक. युजेनिक सोसायटी ऑफ इंग्लंडच्या १९९० सालच्या अहवालानुसार बसून खाणारे बेकारसुद्धा याच वर्गात मोडतात. १९२२ साली अमे- रिकेत अशा सक्तीच्या नसबंदी कायद्याचे आराखडेसुद्धा तयार करण्यात आले होते.जर्मनीतही असे विचार काही लोक मांडत. नाझी ( खरे तर नात्सी) पक्षाच्या अमलात तर नॉर्डिक वंश किंवा खरे बोलायचे तर जर्मन लोक सोडले तर इतर कोणी सुसंस्कृत जीवन जगण्याच्या योग्यतेचेच मानले जात नव्हते. हा टोकाचा विचार बाजूला ठेवला तरी बाकीच्यांची भूमिकासुद्धा गंभीरपणे मांडलेली होती. या सर्वांना भीती वाटे की, कोणताच हस्तक्षेप केला नाही तर समाजात गुणवंतांचे प्रमाण कमी होत जाईल. कारण लोकसंख्यावाढीचे प्रमाण अडाणी, गरीब, मागास वर्गात जास्त तर उच्चशिक्षित, उच्चभ्रू, यशस्वी वर्गामधे फारच कमी. जे. बी. एस्. हाल्डेन हा डाव्या मताचा शास्त्रज्ञ थट्टेने म्हणे की, मग वरच्या वर्गातील लोकांना गरीब करून टाका म्हणजे प्रश्न संपेल !

 विज्ञानाच्या दृष्टीने पहिला कूटप्रश्न म्हणजे खरोखर अनुवांशिक गोष्टी कोणत्या ?क्षयरोग, महारोग, गुप्तरोग हे अनुवांशिक नाहीत. आर्थिक सुबत्ता आली, आरोग्य रक्षण- संवर्धन यांची साधने उपलब्ध झाली, तेव्हा युरोपातून अनेक रोगांचे आपो- आप उच्चाटन झाले. विकसनशील देशांमधेही हे रोग गरिबीचा हात धरून येताना

सुप्रजाजनन / ९९