पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पहिल्या प्रकरणात डार्विनचा मूळ सिद्धांत तपशिलाने दिला आहे. या प्रकरणातून मुख्यतः एक तर्कशास्त्र सिद्ध करायचे आहे. त्याच तऱ्हेचे प्रतिपादन मग पुढच्या प्रकरणांमधे वारंवार मांडले आहे.
उत्क्रांतिवादाच्या संदर्भातील तीन महत्त्वाच्या सामाजिक प्रतिक्रियांची माहिती दुसऱ्या प्रकरणात दिली आहे. हर्बर्ट स्पेन्सर आणि इतरांनी सोशल डार्विनिझम या नावाने मानवी समाजात ' बळी तो कान पिळी' हा न्याय पुरस्कारला, तर खिस्ती दुरभिमानी मंडळींनी डार्विनला बायबलविरोधी टरवले. पीटर क्रोपॉट किन या रशियन क्रांतिकारक तत्त्वज्ञाने डार्विनला बजावले की, परस्परविरोधातून नव्हे तर परस्परसहकारातून खरा विकास होतो. जीवसृष्टीमधे पुढची पिढी बहुतेक सर्व गुणधर्म आईबापांपासून उचलते. माणसापासून माणूस जन्माला येतो. मगरीच्या पोटी मगर येते, माकड नव्हे. हीच अनुवांशिकता. तिच्यामुळेच जीवजातींचे सातत्य आहे. अनुवांशिकता हा उत्क्रांतिवादाचा पायाच आहे. या विषयाची तोंडओळख तिसऱ्या प्रकरणात करून दिली आहे.
उत्क्रांतीच्या प्रेरणेमुळे प्राणी आणि वनस्पती निसर्गाला अनुरूप बनतात. याची साक्ष अक्षरशः पदोपदी येते. अशी अनेक नाट्यमय उदाहरणे चौथ्या प्रकरणात सांगितली आहेत.
रतिमदनाचे खेळ प्राण्यांच्या घडणीमध्ये मोठाच परिणाम करून जातात. मोरांचा पिसारा आणि माकडांमधील सत्तांतर अशी कोडी उत्क्रांतीच्या तत्त्वातून उलगडून दाखवता येतात. ज्यांच्यावर जीव जडला त्यांच्यासाठी कोणताही त्याग करण्याची प्राण्यांची तयारीसुद्धा अशीच समजून घेता येते. ही चर्चा आहे पाचव्या प्रकरणात.
माणसाने फार पूर्वीपासून उत्क्रांतीच्या आणि अनुवांशिकतेच्या तत्त्वांना आपल्या फायद्यासाठी कामाला जुंपले. त्यातून हव्या तशा प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या जाती निर्माण केल्या. स्वतःच्या पुनरुत्पत्तीमधे मात्र माणसाची ढवळाढवळ तितकी यशस्वी झालेली नाही. हा विषय सहान्या प्रकरणात येतो.
१९३० ते १९६४ या काळात रशियामधे डार्विनच्या नावाने अनुवांशिकताशास्त्राच्या विरोधी मोहीम निघाली. त्यात अनेक आघाडीचे शास्त्रज्ञ देशोधडीला लागले किंवा.. मृत्युमुखी पडले. ट्रोफीम डेनिसोविच लायसेंको याच्या पुढाकाराने घडलेले हे भीषण नाट्य सातव्या प्रकरणात वर्णन केले आहे.
जीवसृष्टी कशी निर्माण झाली असावी आणि तिचा विकास कसा घडला असावा, याबाबत एक नवीन सिद्धांत गेल्या काही वर्षात परेड हॉईल या खगोलशास्त्रज्ञाने मांडला

आहे. त्याची रूपरेषा आठव्या प्रकरणात आहे.

तेरा -