पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जीवसृष्टीमधे विविधता असते. त्यापैकी भोवतालच्या निसर्गाला अनुरूप असणारे प्राणी (किंवा वनस्पती) जीवनकलहामध्ये तरतात आणि बाकीचे मरतात. 'सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट ' या शब्दात हा सिद्धांत सूत्ररूपाने सांगता येतो. हा तर्क हाताशी धरून, निसर्गात दिसणाऱ्या कोणकोणत्या गोष्टी आणि घटनांचे स्पष्टीकरण देता येईल याचा शोध शास्त्रज्ञ करतात. सशक्ताने जगावे आणि इतरांनी मरावे असा निसर्गनियम असेल तर आपल्या पिल्लांचे रक्षण करण्याचा प्रसंगी प्राणाची आहुती देण्याचा प्रकार का दिसावा ? नर आणि मादी अशी वेगळी पण पूरक रूपे कशाकरता निर्माण झाली ? प्राणी म्हातारा का होतो ? मधमाशांसारख्या कीटकयोनीमधे राणीमाशीची पिल्लावळ पोसण्यासाठी, आयुष्यभर कष्ट उपसायला बाकी माशा का तयार होतात ? अशी अनेक कोडी सोडवण्यासाठी डार्विनोत्तर काळात, विशेषतः गेल्या पंचवीस वर्षात बरेच प्रयत्न झाले. या वैज्ञानिक प्रवासाची तोंडओळख मराठी वाचकांना करून द्यावी असा माझा प्रयत्न आहे.
खरे तर जीवशास्त्र हा माझा अभ्यासविषय नव्हे. मी काही त्यातला तज्ज्ञ नाही. या लिखाणात जीवशास्त्रीय चुका सापडल्या तर मी त्या आनंदाने सुधारीन. महाविद्यालयामधे. असताना बाबा आमटे यांच्या प्रभावामुळे माझे आदिवासींच्या प्रश्नांविषयी कुतुहल जागे झाले. त्यातून मानवशास्त्र (अँथ्रोपॉलॉजी) या विषयाचे थोडेबहुत वाचन झाले. पुढे पुणे विद्यापीठात संख्याशास्त्राच्या विद्यार्थ्यांना अनुवांशिकता (जेनेटिक्स) या विषयातील संख्याशास्त्रीय भाग शिकवू लागलो आणि त्यानिमित्ताने जीवशास्त्राचा थोडा परिचय झाला. नंतर बंगलोरच्या इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्समधील निसर्गशास्त्रज्ञ (इकॉलॉजिस्ट) डॉ. माधव गाडगीळ आणि कलकत्याच्या इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटमधील मानवशास्त्रज्ञ डॉ. कैलाश मल्होत्रा यांच्याबरोबर भटकंती करण्याची वरीच संधी मिळाली, आणि एका बिनभिंतीच्या शाळेत जिवंतपणे थोडे जीवशास्त्र शिकलो. पुढे डॉ. गाडगीळ यांच्यामुळे १९७९ साली ' इन्होल्यूशन ऑफ सोशल विहेवियर' आणि १९८३ साली 'पॉटियर्स ऑफ इव्होल्यूशनरी बायॉलॉजी' या दोन परिषदांमधे सहभागी होण्याची संधी मला मिळाली. नंतर वाटले की आपल्याला मनोमन भावलेल्या या सगळ्या गोष्टी आपल्या परीने दुसऱ्यांना सांगाव्या.
हे सांगताना माझ्या डोळ्यासमोर एक सामान्य वाचक आहे. तो जीवशास्त्रज्ञ नाही. शास्त्रज्ञसुद्धा नाही. आजूबाजूच्या जगाबद्दल एक किमान कुतूहल मात्र त्याच्याजवळ आहे. तांत्रिक शब्दांचे जडजंबाळ वापरून त्याला नाउमेद करायचे नाही. तसेच इंग्रजी शब्दांचे त्याला वावडेही नाही. यामुळे उगाच मराठी प्रतिशब्द वापरण्याचा अट्टहास ठेवलेला नाही. सहज प्रचलित शब्द सापडला तर जरूर वापरला आहे. पुस्तकाच्या दहा प्रकरणातून

बाचक विनासायास शेवटपर्यंत जाऊ शकला तर मला कृतार्थता वाटेल.

बारा