पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माणसाच्या उत्क्रांतीची चर्चा शेवटच्या दोन प्रकरणांत केली आहे.
आधी सांगितल्याप्रमाणे या लिखाणाला मूळ कारणीभूत आहेत ते माझे मित्र डॉ. माधव गाडगीळ. अर्थात पुस्तकातील कोणत्याही चुकीला मीच सर्वस्वी जबाबदार आहे, हेही मुद्दाम सांगितले पाहिजे .

हे पुस्तक मी लिहिले ते सप्टेंबर १९८३ ते ऑगस्ट १९८४ या वर्षात या काळात मी कॅनडातील कॅलगरी विद्यापीठात गणित विभागात पाहुणा प्राध्यापक म्हणून काम करत होतो. विद्यापीठाच्या समृद्ध ग्रंथालयाचा अर्थातच मला खूप उपयोग झाला. त्याचबरोबर सर्वश्री जे. बी. क्रॅग, व्हॅलेरियस गाइस्ट, रॉस लेन, एडवर्ड जॉन्सन, पॉल अँडरसन अशा अनेक तज्जांशी चर्चाही करता आली. ही संधी मला मिळाली ती माझे मित्र डॉ. जगनाथ वाणी यांच्यामुळे त्यांबद्दल मी कृतज्ञ आहे.
वैज्ञानिक लिखाणामधे जागोजाग ठोस पुरावे उद्धृत करण्याची रीत असते. ते आवश्यकही आहे. पण सर्वसामान्य वाचकाला अशा संदर्भाचा अडथळाच वाटण्याची शक्यता अधिक. म्हणून ही पद्धत टाळून अधिक तपशिलात जाऊन वाचण्याची इच्छा असणाऱ्यांकरता, पुस्तकाच्या शेवटी संदर्भग्रंथांची यादी दिली आहे.
मराठीमधे पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त विज्ञानविषयक ग्रंथनिर्मिती फारच कचित होते. जीवशास्त्रात अलीकडे लिहिले गेलेले माझ्या माहितीतील एक पुस्तक म्हणजे श्री. अशोक पाध्ये यांचे ' डी एन् ए चे गोल गोल जिने' या पुस्तकामुळे माझ्या अनेक कल्पना अधिक स्पष्ट झाल्या. ' म्यूटेशन' या शब्दाला पाध्यांनी योजलेली ' गुणबदल' हा चपखल प्रतिशब्द मी उचलला आहे. पाध्यांच्या लिखाणाची पातळी मला कुठवर गाठता आली है इतरांनी ठरवायचे आहे.
ज्येष्ठ संख्याशास्त्रज्ञ प्रा. पां. वा. सुखात्मे यांचा सहकारी म्हणून तीन वर्षे काम करण्याची संधी मला मिळाली. वैज्ञानिकांच्या अभ्यासामधे सामाजिक प्रश्नांची समज पक्की असण्याचे महत्त्व मी त्यांच्याकडून शिकलो. आपल्या विषयाची चाकोरी आणि मर्यादा ओलांडून जाण्याला त्यांनी सतत उत्तेजन दिले. त्यांनी प्रस्तावना लिहिण्याची विनंती मान्य केली, याबद्दल त्यांचे आभार मानतो.
वाचकांना माझा हा लेखन प्रयत्न उपयुक्त आणि थोडाफार मनोरंजक वाटेल अशी आशा व्यक्त करून हे मनोगत संपवतो.

अनिल गोरे

चौदा