पान:नराचा नारायण (उत्क्रांतिवादाची वाटचाल ).pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 आधुनिक वैद्यकशास्त्राने वंध्यत्वाच्या निरनिराळ्या कारणांवर निरनिराळे उपचार सुचवले आहेत. अशांपैकी सर्वांत नाट्यमय आणि अलीकडचा उपाय म्हणजे शरीर- बाह्य गर्भसंभव किंवा टेस्टट्यूब बेबी. यामधे शुक्रजंतू आणि अंडे यांचे मीलन स्त्री- शरीराबाहेर घडवून असे फलित अंडे किंवा मूलगर्भ पुन्हा स्त्रीच्या गर्भाशयात ठेवला जातो. तेथे त्याची नैसर्गिक तऱ्हेने वाढ होते. असे पहिले बालक इंग्लंडमधे १९७८ साली जन्माला आले. या तंत्रामुळे जगातील लक्षावधी निपुत्रिक दांपत्यांना (किंवा स्त्रियांना ) अपत्यप्राप्तीची आशा निर्माण झाली आहे. १९८३ च्या अखेरीस अमेरिके- मघे सुमारे अर्धा डझन मेडिकल कॉलेजांमधे अशा अपत्यप्राप्तीची सोय झालेली होती. एका गर्भादानाला सरासरी खर्च तीस हजार रुपये होता. पण ते गर्भादान यशस्वी होण्याची शक्यता फक्त २० टक्के होती. म्हणजेच सरासरी पाच वेळा प्रयत्न केल्या- वर यश मिळत असे. पाच प्रयत्नांचा खर्च दीड लाख रुपये ! हा महागडा धोका पत्करण्याला विमा कंपन्या तयार होत नाहीत. तरीसुद्धा शेकडो महिलांना या मेडिकल कॉलेजांच्या प्रतीक्षा यादीवर अनेक महिने वाट पहात थांबावे लागे. इतकी मागणी असल्यामुळे अशी केंद्रे वाढून १९८५ अखेर त्यांची संख्या शंभरावर जाईल असा एक अंदाज आहे. एकीकडे असे आधुनिक पुत्रकामेष्टी यश चालू असतानाच दुसरी- कडे अधिकाधिक गुणवान अपत्य मिळवण्याची धडपडही चालू आहे.

 याकरता इच्छुक स्त्रीला शुक्रजंतूंच्या बँकेकडे जाता येते. नोबेल पारितोषिक विजेत्या पुरुषोत्तमांचे शुक्रजंतू अशा बँकेत साठवून ठेवण्याचा खटाटोप अमेरिकेत कॅलिफोर्निया राज्यात एक कंपनी करते. या संबंधातील सर्व व्यवहारांबद्दल अजून फार गुप्तता पाळण्यात येते. त्यामुळे या बँकांचा उपयोग कितपत होतो हे कळण्याला मार्ग नाही. पण अनेक तज्ञांच्या मनात याबद्दल शंका आहेत. एक म्हणजे या पारितोषिक विजेत्यांच्या कर्तृत्वामधे अनुवांशिक गुणांचा भाग किती आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते अनुवांशिक गुण शुक्रजंतूंमधे उतरले असण्याची खात्री कशावरून ? जॉर्ज बर्नार्ड शॉचा तो प्रसिद्ध संवाद इथे उधृत केलाच पाहिजे. एक रूपगर्विता शॉला म्हणाली की, तुमची बुद्धी आणि माझे सौंदर्य मिळवून जर अपत्य जन्माला येईल तर ते किती नशिबवान ठरेल ! यावर शॉचा प्रतिसाद होता की बाईसाहेब, याच्या उलट घडून तुमची बुद्धी आणि माझे रूपडे जर त्याला मिळाले तर बिचाऱ्याची काय दाणा-

सुप्रजाजमन / ९५